Nashik Bawankule : सत्तेची खुर्ची पाच वर्षासाठी असते. पण काहींना साठ वर्षांची वाटते आणि त्याप्रमाणे वागत असतात. खरे तर सत्तेचा वापर साध्य म्हणून नव्हे तर साधन म्हणून करायला हवा, असे सांगत राज्यात अडीच वर्षे फेसबुकवर सरकार चालत होते, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. तसेच शहरातील भाजपच्या (BJP) शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक घेत अनेकांना धारेवर धरले. 


भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे एक दिवसीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शहरातील विविध भागात भेटी दिल्या. याचवेळी सातपूर (Satpur) येथे आमदार सीमा हिरे (Seema Hiray) त्यांच्या विकास निधीतून उभारण्यात बसस्थानक लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बावनकुळे बोलत होते, ते म्हणाले की मतदारांनी निवडून दिलेल्या आमदारांनी मतदार संघाचा विकास करणे अपेक्षित असते. सरकार आणि जनता यांच्यात वकिलीची भूमिका बजावून अधिकाधिक निधी आणायला पाहिजे, असे सांगून सातपूर बसस्थानकाच्या कामाचे श्रेय हे जनतेला जाते. त्यांच्यामुळेच आमदार हिरे यांनी अद्यावत बसस्थानक उभारले.


यावेळी अशोकनगर येथे उभारण्यात आलेल्या पंढरीनाथ नागरे भाजी मार्केट डोमचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, याप्रसंगी बावनकुळे यांनी सातपूर-नंदुरबार बसला हिरवा झेंडा दाखवला. सोमवारपासून या बसस्थानकावरून नियमित बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अधीक्षक विनोद गणोरे यांनी दिली. दरम्यान सदर उदघाट्नच्या आधी भाजपच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यात शहरातील शक्ती केंद्राचा आढावा घेण्यात आला. मतदान केंद्रातील पाच बूथ मिळून एक शक्ती केंद्रप्रमुखाची नेमणूक केली जाते. त्याने पाचही बूथनिहाय मतदारांची मांडणी करणे, त्यांची राजकीय जवळीकता, सामाजिक व राजकीय संबंध आदी बाबींचा अभ्यास करणे अपेक्षित धरण्यात आले आहे. त्याचा आढावा बावनकुळे यांनी घेतला असता अनेकांना ही संकल्पनाच समजली नसल्याचे लक्षात आले. 


आमदार फरांदेंची अनुपस्थिती


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिक होते. बावनकुळे यांच्या हस्ते सातपूर येथे बस स्थानकाचे लोकार्पण आले. या कार्यक्रमास भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्यासह पक्षाचे शहर व जिल्हा पदाधिकारी आणि काही माजी नगरसेवक देखील उपस्थित होते. मात्र आमदार देवयानी फरांदे या अनुपस्थित असल्याने हा चर्चेचा विषय ठरला.


भाजप शक्ती केंद्र आढावा बैठक


आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपाने नेमलेल्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी एक दोन केंद्र प्रमुखांच्या तयारीची दखल घेत अन्य प्रमुखांच्या सुमार कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. बावनकुळे यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने अनेकांची बोलतीही या बैठकीत बंद झाल्याचे सांगण्यात आले. बावनकुळे यांच्या नाशिक दौऱ्यात पक्ष संघटनेच्या दृष्टीने शहरातील तीनही मतदार संघातील दोनशे शक्ती केंद्र प्रमुखांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली.