Nashik BJP Protest : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली असून राज्यभरात तीव्र आंदोलन (Protest) करण्यात येत आहेत. दुसरीकडे राहुल गांधी यांची लोकसभा खासदारकी रद्द करण्यात आल्याने काँग्रेसने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाशिकमध्ये (Nashik) राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात भाजप आक्रमक झाली असून रविवार कारंजा परिसरात राहुल गांधींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येऊन त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 


राज्यासह देशातील राजकारण ढवळून निघाले असून राहुल गांधी यांनी मोदी (Modi) आडनावावरून विधान केल्याने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एकूणच राजकीय वातावरण तापले असून कालपासून देशभरात काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे मोदी आडनावावरून राहुल गांधी यांनी अवमान केल्याचा आरोप करत भाजप (BJP Protest) रस्त्यावर उतरली आहे. याचे पडसाद राज्यभरात दिसून येत असून भाजप महाराष्ट्राकडून आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक भाजपने देखील रस्त्यावर उतरत राहुल गांधी यांचा निषेध केला आहे. 


राहुल गांधींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) 'सर्व चोरांचे नाव मोदी कसे असू शकते' असं वक्तव्य कर्नाटकच्या प्रचार सभेदरम्यान केले होते. राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरून अपमानास्पद टिप्पणी करताना ओबीसी समाज आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाज बांधवांचा अपमान केला आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. न्यायालयाने याबद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. मात्र ही शिक्षा मान्य करण्याऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलन करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपकडून आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांचा प्रतीकात्मक पुतळा यावेळी दहन करण्यात आला. 


'सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते? असे वक्तव्य 2019च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचार सभेत बोलतांना त्यांनी केले होते. देशभरात मोदी या आडनावाचे प्रतिष्ठीत अनेक व्यक्ती आहेत. डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक, खेळाडू यांचा समावेश आहे. एखादया आडनावाशी संबंधीत जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या व्यक्तीवर मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत असून भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने सिडको येथील त्रिमुर्ती चौकात त्यांच्या पुतळयास जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला आहे.


भाजपचे राज्यभर आंदोलन... 


काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, सुरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांनी दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती. राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप आक्रमक, राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे राज्यभर आंदोलन होत आहे. 'माफी माँगो राहुल गांधी' यासाठी भाजप रस्त्यावर उतरले आहे. राहुल गांधी भारताला बदनाम करत आहेत, यासाठी भाजपचे आंदोलन असल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. आम्ही कुणाला घाबरत नाही...राहुल गांधी यांना या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. विदेशात जाऊन भारताची बदनामी का केली...भारतात आम्हाला स्वातंत्र्य नाही, आम्ही श्वास घेऊ शकत नाही, असे खोटे का बोलले असंही आंदोलक भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.