Sahitya Akadami Award : मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार सिन्नर (Sinner) तालुक्यातील मूळ रहिवासी आणि सध्या मुंबई (Mumbai) येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एकनाथ आव्हाड यांना जाहीर झाला आहे. नाशिकच्या (Nashik) सिन्नर तालुक्यातील मूळचे दापूर येथील असलेल्या एकनाथ आव्हाड यांचे गावकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.


साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या साहित्य अकादमीचे सन 2023 चे बाल साहित्य साठीचे आणि युवा लेखक-लेखिकांसाठीचे पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाले. कवयित्री विशाखा विश्वनाथ (Vishakha Vishwanath) यांना युवा पुरस्कार जाहीर झाला असून बाल साहित्यकार एकनाथ आव्हाड (Eknath Awhad) यांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. एकनाथ आव्हाड यांना 'दिलीपराज' प्रकाशित 'छंद घेई आनंद' या काव्यसंग्रहास हा पुरस्कार जाहीर झाला आहे. एकनाथ आव्हाड हे मुंबई महानगरपालिकेचे (Mumbai BMC) शाळेत गेल्या 30 वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असून सुप्रसिद्ध बाल साहित्यकार व कथाकथनकार मुलांसाठी कथा कविता नाट्यछटा, चरित्र, काव्य, कोडी असे विविध लेखन ते करीत आहेत. त्याचबरोबर कथाकथन, काव्य वाचनाचे कार्यक्रम देखील विविध शाळांमध्ये ते करत असतात.


एकनाथ आव्हाड हे एक प्रयोगशील असे ज्येष्ठ बालसाहित्यकार आहेत. त्यांनी बालकुमारांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्रे, काव्यकोडी इ. वाङ्मयप्रकारांत विपुल लेखन करुन बालसाहित्यात मोलाची भर घातली आहे. एकनाथ आव्हाड यांच्या बालसाहित्याचे वैशिष्ट्य असे, की त्यांच्या लेखनात तोचतोचपणा कधीच नसतो. त्यांची प्रत्येक कलाकृती ताजी-टवटवीत असते. त्यांना नावीन्याचा ध्यास आहे. त्यामुळे त्यांचे बालसाहित्य वाचताना नवीन काही वाचल्याचा आनंद मिळतो. आतापर्यंत आव्हाड यांना कथाकथनातील योगदानाबद्दल अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथा निवेदक पुरस्कार, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा वा गो मायदेव उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार सृष्टी मित्र साहित्य पुरस्कार आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार लाभले आहेत.


ग्रामस्थांकडून तोंडभरुन कौतुक


आव्हाड यांना मिळालेला पुरस्कार निश्चितच अभिमानास्पद आहे त्यामुळे गावाचे नाव देशभर पोहोचले आहे. दापूरसारख्या गावातील शिक्षक मुंबई येथे नोकरी करुन कार्यक्षेत्रात नावलौकिक मिळवत असल्याने आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचे गावकरी प्रा. शिवराज आव्हाड यांनी सांगितले. तर दापूर गावातील ज्येष्ठ नेते शंकरराव आव्हाड म्हणाले की गावाच्या दृष्टीने कौतुकास्पद बाब असून दापूर गावाचे नाव यामुळे प्रसिद्धीस आले आहे. आव्हाड यांच्या आई वडिलांनी हालाखीच्या परिस्थितीत त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. आव्हाडांचा नेहमीच गावाला अभिमान असून त्यांना मिळालेला पुरस्कार तरुण पिढीला ऊर्जा देणारा असल्याचे ते म्हणाले.


हेही वाचा


Bal Sahitya Puraskar : साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा; संगीता बर्वे यांना 'पियूची वही' कादंबरीसाठी पुरस्कार