Nashik News : नाशिक शहराला (Nashik) पूर परिस्थिती काही नवीन नाही. मात्र याच पार्श्वभूमीवर आयुक्त रमेश पवार पाणी सहाही विभागात प्रत्येकी एक असे सहा पर्जन्यमापक यंत्र (Rain Gauge) बसविण्याचा निर्णय घेतला असून या यंत्रामुळे महापालिकेला पावसाचा अचूक अंदाज येणार असून पावसाचा जोर वाढल्यास पुढील उपाययोजना करणे सोपे जाणार आहे. 


दरवर्षीं नाशिक शहराला पुराच्या पाण्याचा (Nashik Flood) फटका बसतो. शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीला हमखास पूर येतो. त्यामुळे नदीकाठच्या वस्त्याना पुराचा सामना करावा लागतो. त्यामुळे सदर परिसरात मोठे नुकसान होते हे नुकसान टाळण्यासाठी नाशिक मनपाने हे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता सहाही विभागात अग्निशमन दलाच्या इमारतींवर ऑटोमॅटिक रेनगेज म्हणजेच पर्जन्यमापक बसवण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त रमेश पवार यांनी बैठक घेत यावेळी हे आदेश दिले आहेत. यंदा पावसाळ्यातच त्याची अंमलबजावणी करण्याचा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या पर्जन्यमापक उपकरणांमार्फत संकलित होणारी माहिती रोजच्या रोज आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवावी यासाठी पत्र पाठवण्यात येणार आहे. 


दरम्यान पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने येत तयारी करण्यात येत असली तरी शहरात किती पाऊस पडणार किंवा पडला, किती विसर्ग होणार यासाठी अन्य शासकीय यंत्रणांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आता आयुक्तांनी महापालिकेची स्वतःची यंत्रणा उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार आता नाशिक मनपाच्या सहाही विभागात हे पर्जन्यमापक यंत्र बसवले जाणार असून त्याद्वारे पावसाचा अंदाज कळणार आहे. शिवाय पावसाचा जो वाढल्यास शासकीय यंत्रणांना पुढील उपाययोजना करण्यास वेळ मिळणार आहे. 


नाशिक शहरातून गेलेली गोदावरी नदी आणि त्यासोबत इतर नद्यांना दरवर्षी पूर येतो. पर्जन्यमानात झालेला बदल यामुळे पुराचा धोका वाढतो. 2008 मध्ये नाशिक शहरात महापूर आला होता. त्यावेळी अनेक भागात पाणी घुसल्याने नागरिकांसह प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. त्यानंतर आता वेळोवेळी पुराचा धोका वाढत चालला आहे. दरवर्षी सराफ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात संकट उद्भवते. त्यामुळे पुराच्या संकटाच्या आधीच शहरी यंत्रणांना माहिती मिळण्यासाठी रेनगेज बसविण्यात येणार आहे. यासाठी आयुक्त रमेश पवार यांनी मुंबईच्या धर्तीवर नाशिक महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्षम करण्याची तयारी सुरू केली आहे. 


सराफ बाजार पाण्यात 
गेल्या आठवड्यात पावसामुळे शहरातील सफर बाजारात गुडघ्याभर पाणी साचल्याने गोंधळ उडाला. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी पावसाची ताजी स्थिती आणि अन्य माहिती संकलित स्वरूपात वेळेत कळावी. यासाठी सहा विभागातील अग्निशामन दलाच्या ठिकाणी पर्जन्यमापक म्हणजेच बसवण्याचे निर्देश दिले. त्यात मॅन्युअली मोजमाप करण्याऐवजी स्वयंचलित पद्धतीने पर्जन्याचे मोजमाप होणार असून त्यामुळे किती मीमी पाऊस झाला हे लगेच कळणार आहे.