Nashik ACB Raid : आदिवासी विभागातील (Tribal Department) लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल (Dineshkumar Bagul) यांच्या नाशिकच्या (Nashik) घरातून 98 लाख 63 हजार तर पुण्यातील घरी 45 लाख 40 हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे (Pune) अशा दोन्ही ठिकाणाहुन एक कोटी 44 लाखांची कॅश सापडली असल्याची माहिती आहे. शिवाय अद्यापही बागुल यांच्या अनेक घरांत झाडाझडती सुरु असून पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापर केला जात असल्याचे समजते आहे. 


गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील (Nashik News) लाचेच्या प्रकरणांत (Bribe Case) वाढ झाली आहे. काल आरोग्य विभागाच्या (Health Deaprtment) उपसंचालकांचे लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असताना आज आदिवासी विकासच्या  बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला विभागाने ताब्यात घेतले आहे. गेल्या 15 दिवसांपासून एसीबी बागूलच्या मागावर होते. सेंट्रल किचनच्या (Central Kitchen) कामासाठी 12 टक्के दराने लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तर कारवाईनंतर लाचखोर अधिकारी दिनेशकुमार बागुलच्या नाशिक आणि पुण्याच्या घरी एक कोटीहून अधिक रोख रक्कम आणि काही महत्वाची कागदपत्रे सापडल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे मशीनच्या सहाय्याने पैशांचे मोजमाप करावी लागणार लागणार असून काल दुपारपासून बागुल यांच्या घरी सुरू असलेली एसीबीची झाडाझडती मध्यरात्रीपर्यंत सुरु होती. लाचखोर बागुलच्या घरात एकूण किती कोटींचे घबाड मिळाले? हा अधिकृत आकडा समजण्यासाठी आज दुपार होणार असल्याचे समजते आहे. 


आदिवासी विभागात उच्च पदावर काम करणारे दिनेश कुमार बागुल यांना काल एसीबीने 28 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. साधारणपणे अडीच कोटींचे काम मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती.  28 लाखांची लाच घेणारा आदिवासी विभागाचा कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांच्या तिडके कॉलनी परिसरातील एका अलिशान अपार्टमेंटमधील घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाल्यांनतर मध्यरात्रीपर्यंत छापेमारी सुरू होती. तसेच  नाशिकसह पुणे आणि धुळ्यातील घरी एसीबीकडून छापेमारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लाचखोर बागुल यांच्याकडे मोठं घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. 


दरम्यान दिनेशकुमार बागुल यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असून पुढील चौकशीसाठी कोठडीची मागणी एसीबीकडून केली जाणार आहे. आदिवासी विकास विभागातील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना तब्बल 28 लाख 80 हजारांची लाच घेतांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल दुपारी तिडके कॉलनी परिसरातील घरी रंगेहाथ अटक केली होती. सेंट्रल किचनच्या दोन कोटी चाळीस लाखांच्या वर्कऑर्डरसाठी बागुल यांनी लाच मागितली होती. 


नाशिकचे बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात 
दरम्यान आदिवासी विकास विभागात बांधकाम अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या दिनेशकुमार बागुल यांनी 28 लाखांची लाच मागितली. याप्रकरणी त्यांना काल दुपारी अटक करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांना 8 लाखांच्या लाचप्रकरणी करण्यात अटक आली होती. मात्र बागुल यांनी तब्बल 28 लाखांची लाच मागितल्याने लाचखोरी प्रकरणात नाशिकमध्ये त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष कालच एका क्लास वन अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहाथ पकडले होते, ती घटना ताजी असतानाच बागुल यांच्यावर एसीबीची धाड पडली. 


पुण्यातही झाडाझडती 
दरम्यान दिनेशकुमार बागुल यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांच्या मालमत्तांच्या संदर्भात सखोल चौकशी करण्यात येत आहे. नाशिकच्या भाड्याने राहत असलेल्या घरातही मध्यरात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरू होती. त्यानंतर धुळ्यातील शामली बंगल्यावरही पथक पोहचले असून तेथेही चौकशी सुरु आहे. 
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक विश्वविहार सोसायटी येथील निवासस्थानी ACB  कडून  काल रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती..या कारवाईच्या दरम्यान त्यांच्या घरातून 45 लाख रुपये कॅश, काही कागदपत्र आणि काही सोन्याचे दागिने सुद्धा सापडल्याची माहिती आहे. पाच अधिकारी काल रात्री उशिरापर्यंत दिनेश कुमार बागुल यांच्या पुण्यातील घरी ही कारवाई करत होते. पंचनामा करून जप्ती करण्यात आली असून यात महत्वपूर्ण कागदपत्रे, एक कोटीहून अधिकची रोकड जप्त केल्याची माहिती आहे. 


नेमकं प्रकरण काय? 
नाशिकच्या त्र्यंबक तालुक्यातील हरसुल मधील मुला मुलींच्या वस्तीगृहातील मध्यवर्ती स्वयंपाक गृहाची उभारणी केली जाणार आहे. जवळपास अडीच कोटींचा निधी यासाठी वापरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रतीची मागणी तसेच कार्यारंभ आदेश देण्याकरता आर के इन्फ्रा कॉन्ट्रो. नावाच्या कंपनीतील तक्रारदाराकडून 12 टक्के दराने मोबदला मागितला. 28 लाख 80 हजार रुपयांची रक्कम बागुल यांनी राहत्या घरी स्वीकारली.