Nashik Mahakavi Kalidas : कवी कालिदास निर्मित 'मेघदूत' या काव्यातील दुसऱ्या श्लोकाची सुरुवात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ असा उल्लेख केल्यामुळे या दिवशी कालिदास दिन (Kalidas Din) म्हणून साजरा होतो. काही वर्षानंतर मेघदूताचा कवी कुसुमाग्रजांनी (kusumagraj) अनुवाद केला. याचवेळी नाशिक शहराच्या मुख्य नाट्यगृहाला कवी कालिदासांचे नाव देण्यात आल्याने नाशिकचे कवी कालिदासांची नाते जुळले. त्यातूनच नाशिकमध्ये कवी कालिदास यांना सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे उजाळा दिला जातो.
आज आषाढाचा पहिला दिवस असून महाकवी कालिदास यांचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी कालिदासप्रेमी नागपूर (Nagpur) जवळील रामटेक येथे असलेल्या कालिदासांच्या स्मृतिस्थळाला भेट देतात. कवी कालिदासांनी आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी मेघदूत (Meghdoot) हे अजरामर खंड काव्य लिहिण्यास सुरुवात केली असे मानले जाते. दरम्यान संस्कृत साहित्यातील या महान कवींची आठवण नाशिककरांना (Nashik) राहावी, म्हणून त्यांच्या नावाने महाकवी कालिदास कलामंदिर उभारण्यात आले. या नाट्यमंदिरासमोर त्यांच्या ‘अभिद्न्यानशाकुंतलम’ या काव्यावर आधारित शिल्प उभारण्यात आले होते.
दरम्यान कवी कालिदास यांनी जवळजवळ 30 साहित्यकाव्ये लिहिलेली आहेत. त्यापैकी 7 महाकाव्ये लिहिलेली असल्याचे सांगितले जाते. मूळ संस्कृतमधील या खंड काव्यांची अनेक कवी साहित्यिक स्वादकांना भुरळ पडली. या काव्याचा कुसुमाग्रजांनी 1956 मध्ये कालिदासाचे मेघदूत या नावाने अनुवाद केला. याशिवाय सण 1987 मध्ये शालिमार (Shalimar) येथील महापालिकेच्या नाट्यगृहाला महाकवी कालिदास कला मंदिर हे नाव कुसुमाग्रजांनी सुचवले होते. काहींनी नाट्यगृहाला कुसुमाग्रजांचे नाव देण्याबाबत आग्रह धरला होता. मात्र त्याला नम्र नकार देत तात्या साहेबांनी कालिदासांचे नाव सुचवले होते. या दोन घटनांनी नाशिकचे कवी कालिदासांशी नाते जुळले. ते दरवर्षी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने बहरत राहिले. आज कालिदास यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आषाढातील पहिला दिवस
मेघदूतम हे खंडकाव्य आहे. या खंडकाव्याची कल्पना कालिदासांनी अशी रचली आहे, की रामगिरीतील शापित यक्षाची पत्नी अलका ही विरहाने व्याकुळ झालेली आहे. तेव्हा हा यक्ष पत्नीला आषाढातील मेघालाच पत्नीला प्रेम संदेश पाठविण्यासाठी दूत बनवितो. या काव्यात शंभरच्यावर कडवी आहेत. स्त्रीच्या उत्कट प्रेमावर जिवंत राहणाऱ्या मानवाची ही कथा मेघदूतममध्ये विस्तारितरीत्या अधोरेखित केली आहे. त्याला मार्गात लागणारी पर्वत नद्या नगरे वने यांचे रमणे वर्णन या काव्यात आले असून कालिदासांच्या प्रतिभेचा प्रत्यय त्यातून दिसून येतो.
नाशिकमध्ये विविध कार्यक्रम
महाकवी कालिदास दिनानिमित्त नाशिक महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आज सायंकाळी साडेपाच वाजता महाकवी कालिदास मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्यात बागेश्री वाद्य वृंदांतर्फे नाटककार विद्याधर गोखले लिखित संगीत जय जय गौरीशंकर या नाटकातील नटराज्याची नांदी सादर केली जाणार आहे. मुग्धा दंडवते, स्मिता हिरे, गीता पवार, शीला दंडवते, हर्षा भारंबे आदी कलावंत गायन करणारा असून संगीत संयोजन चारुदत्त दीक्षित सुधीर करंजीकर यांच्या आहे. त्यानंतर राजेश शर्मा दिग्दर्शित 'आषाढातील एक दिवस' नाटक सादर होणारा असून त्यात भगवान निकम, विक्रम गवांदे, चंद्रवदन दीक्षित, प्रबुद्ध माघाडे, निकिता शिंदे, धनश्री शेळके, विशाखा धारणकर यांच्या भूमिका आहेत. दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्य परिषद अध्यक्ष रवींद्र कदम प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी केले आहे.