Nashik NMC Bharti : नाशिक (Nashik) महापालिकेतील (Nashik Mahapalika) गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित नोकर भरतीसाठी राज्य सरकार अनुकूल झाले असून पहिल्या टप्प्यातील अग्निशमन विभागातील रिक्त असलेल्या फायरमनचा 208 पदांच्या भरतीला हिरवा कंदील मिळाला आहे. या पदांसाठीची सेवा प्रवेश नियमावली तसेच आरक्षण बिंदू नामावली नगर विकास विभागाने (Department of Urban Development) मंजुरी दिली. त्यामुळे महापालिकेने या पदांची भरती त्रयस्थ संस्थेमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार (NMC Commissioner) यांनी दिली.
नाशिक महापालिकेला सध्या मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असून गेल्या 24 वर्षांत नाशिक महापालिकेत एकही भरती झाली नसल्याचे वास्तव आहे. महापालिकेत वर्ग संवर्गातील मंजूर पदांची संख्या 7082 इतकी असताना नियत वयोमानानुसार निवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्त पदांची संख्या 2600 वर गेली आहे. सध्या स्थितीचा विचार करता नाशिक महापालिकेत साडेचार हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने 2017 ला नोकर भरती बाबत फाईल मंत्रालयात पाठवली होती. मात्र ही भरती प्रक्रिया काही ना काही कारणास्तव अडकली होती .
दरम्यान नगर विकास विभागाने पहिल्या टप्प्यात अग्निशमन विभागातील फायरमनच्या रिक्त असलेल्या 208 पदांच्या भरतीला हिरवा कंदील दर्शवला असून या पदांसाठीची सेवा प्रवेश निर्माण नियमावली मंजूर केली आहे. सद्यस्थितीत अग्निशमन विभागात फायरमांची 299 पदे मंजूर असून त्यापैकी सध्या 91 पदे कार्यरत आहेत. रिक्त पदांची संख्या मोठी असल्यामुळे पहिल्या टप्प्यात या विभागातील वित्त असलेल्या 208 पदांसाठीची सेवा प्रवेश नियमावली आणि आरक्षण बिंदू नामावलीला मंजुरी देण्यात आली आहे.
दरम्यान महापालिका रुग्णालयांमध्ये तज्ञ डॉक्टरांचे पदे रिक्त असल्यामुळे या डॉक्टरांची सरळ सेवेने भरती होईपर्यंत तूर्तास सहा महिने कालावधीसाठी 45 डॉक्टरांचे पदे मानधनावर नियुक्त करण्याच्या वैद्यकीय विभागाच्या प्रस्तावाला महासभेत मान्यता देण्यात आली. ही भरती प्रक्रिया सरकारच्या आरक्षण पद्धतीने अर्थात रोस्टर पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. नगर विकास विभागाने अग्निशामन विभागातील 208 पदांच्या भरतीला परवानगी दिली असून या पदांची सेवा प्रवेश नियमावली देखील मंजूर केली आहे. त्यामुळे या पदांच्या भरतीसाठी प्रशासनाने टीसीएस एमकेसीएल आयबीपीएस ला पत्राद्वारे विचारणे केली असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे.
त्रयस्थ संस्थेमार्फत भरती
मागील अनेक वर्षांपासून महापालिकेत भरती झाली नसल्याने तसेच महापालिका प्रशासन भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नगर विकास विभागाने अग्निशामनच्या 208 पदांना मंजुरी दिल्यानंतर या पद भरती प्रक्रिया त्रयस्थ संस्थेमार्फत करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यानुसार टाटा कन्सल्टिंग सर्विसेस, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थांना पत्र लिहून त्यांच्याकडून भरती करण्यासंदर्भातील प्रस्ताव मागवण्यात आला आहे.