Nashik Prafull Patel : अजित पवारांनी (Ajit Pawar) सूचित केले म्हणजे उद्या त्यांना मुख्यमंत्री व्हायचे, असे काहीही नाही, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करते आहे आणि सगळे निर्णय पवार यांच्या माध्यमातूनच होत असतात, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी केल आहे. दिल्लीला असो किंवा मुंबईला (Mumbai) आमच्यात कुठलीही बैठक झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे नाशिकला (Nashik) खाजगी दौऱ्यावर आलेले असताना नाशिक विमानतळाबाहेर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येणार भाजप (BJP) सोबत जाणार का? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, आम्हाला विकासाची आघाडी सगळीकडे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात सर्वत्र विकास व्हायला हवा. मुख्यमंत्री बदलाबाबत माहीत नाही, ज्यांनी सरकार उभे केले, त्यांनाच विचारा आमचा पक्ष वाढला पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. अजित पवारांनी सूचित केले म्हणजे उद्या त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असे नाही. पक्षाला मोठे करा, स्पर्धेत भाग घेण्याची प्रत्येकाला इच्छा आहे. राष्ट्रवादीला बळकट करायचे आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करत असल्याचे पटेल म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावर प्रफुल्ल पटेल पुढे म्हणाले की, दिल्लीत आमच्यात कोणतीही बैठक झाली नाही. मुंबईत पक्षाचे हेडक्वार्टर आहे, त्यामुळे बैठका होतात, पण दिल्लीत कोणतीही झाली नाही, हे स्पष्ट करतो. राष्ट्रवादी पक्ष पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करते आहे आणि सगळे निर्णय पवार यांच्या माध्यमातूनच होत असतात. तसेच कोकण रिफायनरीबाबत पटेल म्हणाले की, रिफायनरीचा विषय खूप वर्षांपासून आहे. त्याला कोकणवासियांचा विरोध आहे. आता हा विषय नव्याने का आला, हे माहीत नाही. कोकणातील लोकांना विश्वासात घेऊन काम करा, असा सल्ला पटेल यांनी दिला.
वेगळा अर्थ काढणार ....
शरद पवार यांच्याबाबत मी थोडं जरी काही बोललो तरी तुम्ही मिडीया वेगळा अर्थ काढणार असल्याचे दिसते. राष्ट्रवादीतील नेते, कार्यकर्ते सगळे एकमताने काम करत आहेत. प्रफुल्ल पटेल हा पक्षाचा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे, यात दुमत नाही. जे करू ते एकत्रपणे करू आता तो काही विषय नाही, जो तुमच्या मनात आहे. धाराशिव आणि संभाजीनगरचा विषय न्यायप्रविष्ट आहे, मी भाष्य करणार नाही. शासनाचा निर्णय आहे, पुढची प्रक्रिया बघू, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.