Nashik Shivsena : औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar) आणि उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) असे नामकरण करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर राज्यभरात जल्लोष पाहायला मिळत आहे. दरम्यान नाशिकमध्ये (Nashik) देखील जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळालं असून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात आला.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या (Osamnabad) नामांतराला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar) आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव (Dharashiv) असं असणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं राज्यभरातून स्वागत होत असून राज्य सरकारकडून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. दरम्यान नाशिकमध्ये देखील शिंदे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व फटाके व फोडून जल्लोष साजरा केला आहे.
नाशिक शहरातील शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयाबाहेर सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभाग झाले होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान यावेळी अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व गहाण ठेवल्याची टीका शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. गेल्या 35 वर्षांपासून औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी होत होती. दरम्यान अखेर केंद्राने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्याच्या निर्णयाला परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वच हिंदुत्ववादी पक्षाच्या नेत्यांनी जल्लोष केला आहे. दरम्यान शिंदे गटाच्या शिवसेनेने औरंगाबाद शहरातील दुकानावर असलेल्या औरंगाबादच्या नावावर आता छत्रपती संभाजीनगरचे स्टिकर लावण्यास सुरवात केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना उत्तर
औरंगाबाद शहरातच नव्हे तर आता जिल्ह्यांचेही नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रशासनाच्या वतीने यासंबंधीचे राजपत्र नुकत्याच जारी करण्यात आला आहे. दरम्यान केवळ शहराचे नाव बदलण्याचा उल्लेख करण्यात आला असून जिल्ह्याचे नाव कधी बदलणार यावरून देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांकडून सवाल करण्यात आले, त्याला उत्तर देत 'आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या, केंद्र सरकारचे मंजूरची प्रक्रिया पूर्ण झाली की आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात'. ही अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यानुसार औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण झाले आहे, असे फडणवीस यांनी ट्विट करत सांगितले आहे.