Nashik Accident : रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan) निमित्ताने नाशिकहून (Nashik) सिन्नर (Sinnar) येथील बहिणीकडे जात असलेल्या एका भावाचा दुर्दैवी अपघातात (Accident) मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी भावाचा मृत्यू झाल्याने बहिणीसह कुटुंबीयांनी आक्रोश केला. महत्वाचे म्हणजे अवघे 16 वय असणाऱ्या मुलाचा महामार्गावरील (Nashik Sinnar Highway) ट्रकचालकाच्या हलगर्जीपणामुळे एका कोवळ्या मुलाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 


नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील कमलनगरमध्ये राहणारा आणि स्थानिक महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेणारा विवेक मोरे हा 16 वर्षांचा कोवळा जीव हे जग सोडून गेला आहे. रक्षाबंधनच्या दिवशी विवेक हा आपल्या वडीलांसोबत नाशिकला आत्याकडे आला होता. मात्र विवेकची बहीण राखी बांधण्यासाठी विवेकची वाट बघत असल्याने विवेक आणि त्याचे वडील दुचाकीवरून नाशिकहुन पुन्हा सिन्नरकडे निघाले होते. महामार्गावरून जात असतानाच पळसे गावाजवळ मागून भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या ड्रीम योगा या दुचाकीला धडक दिली. या घटनेत दोघेही खाली रस्त्यावर कोसळले. 


दरम्यान विवेकच्या वडीलांनी डोक्यात हेल्मेट घातले असल्याने ते सुदैवाने यात बचावले. मात्र विवेकच्या डोक्याला आणि शरीराच्या ईतर भागावर गंभीर मार बसला होता. मदतीसाठी विवेकच्या वडीलांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागली होती. अखेर एक कारचालक त्यांच्या मदतीसाठी धावून आले. विवेकला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल तर करण्यात आले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 


रक्षाबंधन म्हणजेच बहीण आणि भावाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखला जाणारा सण मात्र याच दिवशी विवेकच्या बहिणीसह कुटुंबावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विवेकच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे. विवेकने आणि त्याच्या बहिणीने खूप शिकावं, मोठं व्हावं हे स्वप्न घेऊन आई - वडील दोघेही नोकरी करतात. मात्र कोवळ्या वयातच विवेक हे जग सोडून गेल्याने माझ्यासारखी वेळ कोणावर येऊ नये म्हणून दुचाकीवर बसलेल्या दोघांनी हेल्मेट घालावे, असे आवाहन विवेकचे वडील श्रीनिवास मोरे करत आहेत. 


ट्रकचालक अद्यापही फरार 
विवेकच्या मृत्यूनंतर नाशिकरोड (NashikRoad Police Station) पोलिस ठाण्यात अकरा ऑगस्टलाच अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र श्रीनिवास मोरे यांच्या तक्रारीनंतर 16 तारखेला याप्रकरणी फरार ट्रकचालकाविरोधात हिट अँड रन आणि मोटर वाहन अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे ही घटना होऊन अकरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र अजूनही संबंधित ट्रक किंवा ट्रकचालकाचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले नसून विनायक मेटेंच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकाला तात्काळ ताब्यात तर घेण्यात आले. मात्र हाच न्याय अजून माझ्या मुलाला का मिळाला नाही? नाशिक पोलिसांना आरोपीचा शोध का लागत नाही? असा सवाल श्रीनिवास मोरे हे सरकार आणि पोलीस यंत्रणेला विचारत आहेत. सिन्नर ते नाशिक असा जवळपास 30 किलोमीटरचा रोज प्रवास करत नाशिकरोड पोलिस ठाण्यात ते चकरा मारतायत तसेच स्वतः श्रीनिवास मोरे हे  संबंधित ट्रकचालकाचा शोध घेत असून नाशिक पुणे महामार्गावरील अनेक दुकानांचे सिसीटिव्ही फुटेजही त्यांनी गोळा केले आहेत.     


सरकारच्या ठोस उपाययोजना कधी? 
विनायक मेटेंच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकाला तात्काळ ताब्यात तर घेण्यात आले. मात्र हाच न्याय अजून माझ्या मुलाला का मिळाला नाही ? असा सवाल मुलाच्या वडिलांनी सरकार आणि पोलिस यंत्रणेला केला आहे. या घटनेनंतर पुणे - नाशिक महामार्गाचा एबीपी माझाने (ABP Majha) पंचनामा केला असता अनेक ट्रक तसेच कंटेनर चालक बेशिस्तपणे लेन कटिंग करत तसेच भरधाव वेगात वाहन चालवत असल्याचं दिसून आलं तर बऱ्याच ट्रक या महामार्गावर कडेलाच धोकेदायक पद्धतीने उभे करण्यात आल्याचही नजरेस पडलं. या बेशिस्त ट्रकचालकांना शिस्त लागणार तरी कधी ? अजून किती बळींची महामार्ग पोलिस वाट बघतायत ? महामार्गावरील अपघात कमी होण्यासाठी सरकार काही ठोस उपाययोजना का राबवत नाही ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.