Nashik News : काही दिवसांपूर्वीच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील एका जवानाचे निधन झाल्याची घटना घडली होती. आत सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील जवानाचे अपघाती निधन झाले आहे. या घटनेमुळे सिन्नर (Sinnar) तालुक्यासह खंबाळे गावावर शोककळा पसरली असून ते नुकतंच आठवडाभराची सुट्टी घेऊन गावी आले होते. मात्र सुट्टीवर असताना अपघाती निधन (Accident) झाले आहे.
जितेंद्र संपत आंधळे (Jitendra Andhale) असे मृत्यू झालेल्या लष्करी जवानाचे नाव आहे. आंधळे हे 23 मराठा बटालियनमध्ये (Maratha Batalian) केरळ राज्यात कार्यरत होते. नुकतीच त्यांची कर्नाटक राज्यात बदली झाल्यामुळे 21 मार्च रोजी ते पत्नी व मुलांना घेऊन गावी आले होते. पाठोपाठ त्यांचे घरातील सामानही गावी आणण्यात येत होते. पत्नी व मुलांची गावी व्यवस्था करून ते आठवडाभराने पुन्हा नवीन नियुक्तीच्या जागी हजर होणार होते. काही दिवसांचीच सुट्टी असल्याने ते सर्वच नातेवाईकांना भेटण्यासाठी फिरत होते. गुरुवारी रात्री ते पत्नी व मुलांना घेऊन मानोरी येथे सासरवाडीला गेले होते. गुरुवारी रात्री पत्नी ज्योती, मुलगा पियुष, मुलगी आरोही यांना घेऊन ते जवळच असलेल्या मानोरी सासरवाडीला गेले होते.
साडू ज्ञानेश्वर उत्तम सांगळे यांना सोबत घेऊन सासरवाडीहून परत येत असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik Pune Highway) नांदूर शिंगोटे जवळ अपघात झाला. नांदूर शिंगोटे बायपासजवळ समोरून चुकीच्या बाजूने भरधाव आलेल्या कारच्या हेडलाईट डोळ्यावर आल्याने आंधळे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर धडकून अपघात झाला. या अपघातात आंधळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेले ज्ञानेश्वर सांगळे हे जखमी झाले. अपघाताची माहिती समजल्यावर नांदूर शिंगोटे परिसरातच असलेले वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे, उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
स्थानिक रहिवाशांच्या मदतीने दोघांनाही दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, तेथे पोहोचण्यापूर्वीच आंधळे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले सांगळे यांच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी सिन्नरला देण्यात आले. दरम्यान आंधळे यांच्या अपघाती मृत्यूची माहिती त्यांच्या लष्करी हेडक्वार्टरला देण्यात आली. दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास मूळ गावी खंबाळे येथे त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. जवान आंधळे हे 2011 मध्ये लष्करी सेवेत दाखल झाले होते. त्यांचे पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई व मोठा भाऊ, त्याचे कुटुंबीय असा परिवार आहे.
दहा दिवसांपूर्वीच सिन्नरच्या जवानांचे निधन
गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यातील अनेक जवानांचे निधन झाले आहे. दरम्यान मागील दहा दिवसांत सिन्नर तालुक्यातील दुसऱ्या जवानांचे निधन झाले आहे. ११ मार्च रोजी सिन्नर तालुक्यातील अगासखिंड येथील जवानास प्राणज्योत मालवली होती. हवालदार खंडू भागुजी बरकले असे या जवानाचे नाव आहे. ते जम्मू काश्मीर येथील लेह येथे कार्यरत होते.