Nashik Dindori Accident : नाशिकच्या (Nashik) वणी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या आणि एका दिवसावर सेवा निवृत्ती कार्यक्रम असलेल्या प्राध्यापकाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सेवानिवृत्तीनंतर सुखी जीवनाचे स्वप्न पाहणाऱ्या एका प्राध्यापकाचा दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्याजवळ अपघाती (Accident Death) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रामदास माधव शिंदे असे अपघातात मृत्यू झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. 


कसा झाला अपघात?


नाशिकसह जिल्ह्यात अपघातांच्या (Nashik Accident) घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कधी अतिवेगाने वाहन चालवल्याने, दुचाकी घसरल्याने, ओव्हरटेक करताना अपघाताच्या घटना घडत आहेत. असाच एक अपघात दिंडोरी तालुक्यातील (Dindori) वलखेडजवळ घडला आहे. निफाड तालुक्यातील रौळसपिंप्री येथील राहणारे प्राध्यापक रामदास शिंदे (Ramdas Shinde) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ते वणी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. मात्र आता कार्यकाळ संपल्याने ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी शिंदे हे नाशिकवरुन वणीकडे आपल्या अल्टो कारने निघाले होते. यावेळी दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा परिसरात असताना दिंडोरीकडे येणारी पिकअप आणि अल्टो कार यांची समोरासमोर जोरदार धडक बसली. त्याचवेळी पिकअपच्या मागून येणारी मोटरसायकल अल्टो कारला येऊन धडकली. अपघात एवढा भयानक होता की अल्टो कारचा समोरील भाग पूर्ण दाबला गेला.


दरम्यान या अपघातात प्राध्यापक शिंदे यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागला. त्याचबरोबर पिकअप चालक सागर पेलमहाले आणि विठ्ठल पागे हे सुद्धा जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्राध्यापक शिंदे यांना जबर मार लागल्याने आणि रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राध्यापक शिंदे यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे. 


दुसऱ्या दिवशी रिटायरमेंटचा कार्यक्रम अन् आज... 


प्राध्यापक रामदास शिंदे हे मूळचे निफाड तालुक्यातील जवळच रौळसपिंप्रीचे होते. चांगले आणि मनमिळावू शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होते. अनेक वर्षांपासून वणी महाविद्यालयात कार्यरत होते. आता त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होती. यासाठी प्राध्यापक शिंदे यांनी अनेकांना आमंत्रण दिले होते. मात्र दुर्दैवाने त्यांच्या अंत्यविधीला सर्वांना उपस्थित राहावे लागल्याची खंत उपस्थितांनी बोलून दाखवली. लोकप्रिय सरांना सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात निरोप देण्याची वेळ आल्याने अंत्यविधी प्रसंगी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. 


वलखेड फाटा अपघाताचे केंद्र 


दरम्यान नाशिकसह जिल्ह्यात अपघाताच्या अनेक घटना घडत आहे. प्राध्यपक शिंदे यांचा ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी यापूर्वीही अनेक बळी गेले आहेत. दिंडोरी आणि वणी बाजूने उतार असल्याने अनेक वाहने वेगाने येतात. समोरुन येणारे वाहन चालकाला लक्षात येत नाही. त्यामुळे ओव्हरटेकच्या प्रयत्नात आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वलखेड फाट्यावर रबरी स्पीडब्रेकर टाकण्यात आले होते. परंतु ते निकृष्ट असल्याने निघून गेले आहेत. त्यामुळे येथे वाहने ब्रेक लावण्याऐवजी सुसाट धावत असतात. नाशिक ते वणी रस्त्याच्या अनेक तक्रारी असतानाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कधीही लक्ष दिले नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.