Nashik News : नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत सातत्याने लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाच्या कारवायांचा धडाका सुरु आहे. सातत्याने नाशिक शहरातील बड्या अधिकाऱ्यांच्या लाच प्रकरणात मुसक्या आवळण्यात येत आहे. आताच्या मोठ्या कारवाईत मनपा शिक्षणाधिकाऱ्याला एसीबीच्या पथकाकडून 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. आता एसीबीच्या झाडाझडतीदरम्यान लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरातून घबाड हाती लागले आहे. 


नाशिक (Nashik) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. डॉ. सतीश खरे यांच्यावरील कारवाईनंतर सर्वात मोठी कारवाई नाशिकच्या मनपा शिक्षण विभागात करण्यात आली आहे. येथील मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत कर्मचारी नितीन जोशी यांना देखील पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. त्यानंतर धनगर यांच्या घराची झाडाझडतीचे आदेश अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिले असता एकूण 85 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोने हाती लागल्याने एसीबी पथकही चक्रावून गेले.


दरम्यान लाचखोर महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांकडून मोठं घबाड हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यादृष्टीने एसीबीकडून तपास सुरु आहे. आतापर्यंतच्या तपासात लाचखोर सुनीता धनगरांकडे मोठं घबाड सापडलं आहे. धनगर यांच्या घरात तब्बल 85 लाख रोख रक्कम आणि 32 तोळे सोन्याचे दागिने करण्यात हस्तगत आले. त्याचबरोबर धनगरांच्या नावावर 2 आलिशान फ्लॅट आणि एक जागा देखील आहे. म्हत्वाचे म्हणजे उंटवाडी परिसरातील राहत्या फ्लॅटचीच किंमत दीड कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सुनीता धनगर यांची बँक खाते, लॉकर्स किती? याबाबत तपास सुरु असून सुनीता धनगरांनी आणखी किती माया कमावली याचा आलेख लवकरच समोर येणार आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


एका खाजगी शिक्षण संस्थेच्या हिंदी माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना काही कारणास्तव संस्थेने निलंबित केले. त्या विरोधात त्याने शैक्षणिक न्यायाधिकरणात दाद मागितली. न्यायाधिकरणाने मुख्याध्यापकांच्या बाजूने निकाल दिला. मात्र तरीही संस्थेने त्यांना नियुक्त करण्यास नकार दिला. त्यामुळे शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे मुख्याध्यापकांनी अर्ज केला. संस्थेला नियुक्ती करण्याबाबतच्या आदेश देण्यासाठी धनगर व लिपिकाने लाच मागितल्याचे प्रकरण समोर आले. लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरात जवळ आठ तास एसीबी पथकाचा तपास सुरु होता. यातही चार ते पाच तास हे रक्कम मोजण्यात गेले. शेवटी रक्कम मोजण्यास अडचण येत असल्याने थेट मशीनच्या साहाय्याने 85 लाख रुपयांची रोकड मोजण्यात आली. तरीदेखील अद्याप बँक खात्यासह इतर मालमत्ता तपासणी करणे सुरु असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले आहे. 


धनगर यांची वादग्रस्त कारकीर्द? 


दरम्यान नाशिक महापालिकेच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. यानंतर धनगर यांनी शिक्षण विभागात केलेल्या गैरप्रकाराच्या चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वीही अनेक कामांमध्ये त्यांनी गैरप्रकार केल्याची माहिती शिक्षण विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी देत असून यामुळे अजूनही काही गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेत शिक्षणाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी तीन वर्ष धनगर देवळा तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यापूर्वी नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. तर नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागात गेल्या तीन वर्षापासून सुनीता धनगर कार्यरत असून या तीन वर्षात त्यांनी अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप शिक्षक, शिक्षकेतरांमधून होत आहे.