Sant Nivruttinath Palkhi : 'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया, 'विठ्ठलाच्या पायी नीट झालो भाग्यवंत' अशा असंख्य अभंगांनी त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली. निमित्त होते, आज संत  निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी पालखी (Sant Nivruttinath Palkhi Sohala) सोहळा पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान झालेला आहे. 'गळ्यात तुळशीमाळा, डोईवर तुळशी वृंदावन, हाती वीणा, मुखात हरिनाम' अशा भक्तीमय वातावरणात आज संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. 


श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी चांदीचा रथ पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे. आज दुपारी त्र्यंबकेश्वर नगरीतून पालखी सोहळ्याला सुरवात झाली. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) जवळील प्रयागतीर्थ परिसरात महानिर्वाणी आखाड्यात घेतला जात आहे. यानंतर उद्या सकाळी पुन्हा पंढरपूरकडे जाण्यासाठी दिंडी सोहळा मार्गस्थ होणार आहे. तत्पूर्वी दोन दिवसांपासून वारकरी भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होत होते. मराठवाडा (Marathwada), विदर्भ, परभणी, धुळे, नंदुरबार, जळगाव येथून भाविक भक्त त्र्यंबकेश्वर (Trimbak) येथे दाखल झाले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातून 25 हजार वारकरी या दिंडीत सामील होतील असा अंदाज आहे. 


यावेळी हजारो वारकरी बांधवांनी या पायी दिंडी पालखी सोहळ्यात सहभाग घेत आनंदवारीचा (Ashadhi Ekadashi) आनंद लुटला. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलं. पहाटेच्या सुमारास पारंपरिक पूजा विधी झाल्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. यावर्षी एक दिवस अगोदर पालखी पंढरपूरला रवाना होणार असून पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर शहरातील श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यात होत आहे. या महानिर्वाणी आखाड्यात गुरु गहिनीनाथांची समाधी असल्याने इथे पहिला मुक्काम होणार आहे.


त्र्यंबकला भरला वारकऱ्यांचा मेळा 


दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यासाठी रथ तयार करण्यात येतो. सात वर्षांपूर्वी सुमारे एक कोटी रुपये खर्च करून मागील विश्वस्त मंडळांने चांदीचा रथ पालखी सोहळ्यासाठी तयार केलेला आहे. या रथाला झळाळी देण्यात आली असून आज दुपारी रथाद्वारे नाथांच्या पालखी सोहळ्याला सुरवात झाली. दरम्यान सर्वात लांब पल्ल्यांच्या पालखीमध्ये संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा समावेश होतो. त्यामुळे या पालखीला विशेष महत्त्व आहे. तसंच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे मोठे बंधू म्हणून देखील निवृत्तीनाथ महाराज यांचं वारकरी संप्रदायामध्ये एक वेगळं स्थान असल्याने या वारीत सहभाग घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून वारकरी येत असतात.


असा असणार पायी दिंडी प्रवास 


दिंडीतील वारकरी मंडळी रोज दिवसा वीस किलोमीटर पायी प्रवास करतात. तर वेळापत्रकाप्रमाणे रात्री नियोजित असलेल्या ठिकाणी मुक्काम करत दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपुरात पोहोचते. या दरम्यान चार मुक्कामानंतर पंढरपूर वारी करून पालखी त्र्यंबकेश्वरकडे माघारी येईल. 18 दिवसांचा पायी प्रवास करून 30 जुलैला पालखी त्र्यंबकेश्वरमध्ये परत दाखल होईल. त्र्यंबकेश्वर, सातपूर, नाशिक, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगन, अहमदनगर, साकत, घोगरगाव मिरजगाव, चिंचोली (काळदाते) कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले, करकंब, पांढरीवाडी, चिंचोली, पंढरपूर.असा पायी दिंडीचा मार्ग असणार आहे.