Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात लाचखोरीच्या (Bribe) घटना वारंवार सुरूच असून मागील पंधरा दिवसांत महावितरणच्या चार अधिकाऱ्याना एसीबीने लाच प्रकरणात ताब्यात घेतले आहे. तर नाशिक विभागात गेल्या 22 दिवसात 9 लाचखोर नाशिक लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. 


गेल्या काही महिन्यात नाशिक शहरासह जिल्ह्यात (Nashik District) लाचखोरीच्या घटनांनी उत आणला होता. तर काही दिवसांपासून हे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र पुन्हा एकदा एसीबीने धडक कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून सातत्याने लाचखोरीच्या घटना जिल्ह्यात उघडकीस येत आहेत. चांदवड व घोटी येथील अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर काही दिवसांपूर्वी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता असलेल्या  अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर आज पुन्हा लाच स्वीकारल्या प्रकरणी महावितरणच्या (mahavitaran) वर्ग दोनचे दोन अधिकारी आणि एका लिपिकाला ताब्यात घेतले आहे. 


नाशिक शहराला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई केली असून यामध्ये महावितरणचे वर्ग दोनचे दोन अधिकारी आणि एका लिपिकाला ताब्यात घेतले आहे. डीपी, मीटर कनेक्शन बाबत परवानगी देण्यासाठी ठेकेदाराकडे साडे सहा हजारांची लाच मागितली. नाशिकरोड परिसरातील महावितरणच्या विभाग एकच्या कार्यालयात नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. यामधेय संशयित कार्यकारी अभियंता दीप्ती वंजारी, सहाय्यक अभियंता राजेंद्र पाटील, निम्नस्तरीय लिपिक सचिन बोरसे यास लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. 


काही दिवसांपूर्वीच महावितरणच्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय मारुती घालपे यास ताब्यात घेतलं होत. एका बिल्डिंगच्या साईटवर ट्रांसफार्मर बसवणे, तसेच प्रत्येक इलेक्ट्रिक मीटरचे कनेक्शन देणे असे काम होते. या कामासाठी घालपे याने वीस हजार रुपयांची मागणी केली. बिल्डिंग साइटवर 41 वीज मीटर ट्रांसफार्मर बसवणे. या कामास मंजुरी देण्याचे अधिकार घालपेकडे होते. त्या बदल्यात त्यांनी ही लाच मागितल्याचे समोर आले आहे. पाचशे रुपये प्रति मीटर प्रमाणे 41 मीटरचे वीस हजार पाचशे रुपये द्यावे, अशी मागणी त्याने केली तडजोडीअंती ही रक्कम 17 करण्यात रुपये करण्यात आली होती. 


22 दिवसांत नऊ अधिकारी जाळयात 
नाशिकच्या अधिकाऱ्यांना झालंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा लाचखोरीच्या घाटांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नाशिक विभागात मागील बावीस दिवसात 9 अधिकारी एसीबीच्या जाळयात सापडले आहेत. त्यामुळे हे प्रमाण अत्यंत घातक असल्याचे दिसून येत आहे. सुरवातीला पोलीस प्रशासनाला लाचखोरीचे ग्रहण लागल्याचे दिसत होते. आता नाशिकचे महावितरण पुढे येऊ लागले आहे. मागील दहा दिवसांत चार महावितरणचे वर्ग 2 चे अधिकारी जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने अधिकारी वर्गच लाचखोर होऊन जनतेची लूट करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कुणाकडे दाद मागायची असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.