Shirdi Sai Baba : शिर्डीतील (Shirdi) साईबाबा चरणी (Saibaba) यंदा वर्षभरात 400 कोटींचं दान (Donate) अर्पण करण्यात आलं आहे. दक्षिणा पेटीत 166, देणगी काउंटर वर 66 कोटी, 25 किलो सोनं आणि या व्यतिरिक्त 326 ग्रॅम चांदी सुद्धा साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे.
देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेले शिर्डीचे साईमंदिरास यंदा 1 जानेवारी ते 26 डिसेंबर दरम्यान संस्थानला सर्व प्रकारे एकुण 394 कोटी 28 लाख 36 हजार देणगी मिळाली आहे. 31 डिसेंबरपर्यंतच्या देणगीसह हा आकडा चारशे कोटींचा विक्रमी टप्पा पार करण्याची चिन्हे आहेत. साई संस्थानच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. प्रत्येक वर्षी साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या देणगीमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. साई संस्थानचे आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असे असते. परंतु, जानेवारी ते डिसेंबर या कॅलेंडर वर्षात साई संस्थानला किती दान आले, याची उत्सुकता अनेकांना असते. दरम्यान यंदा हे दान भरभरून मिळाला असून जवळपास चारशे कोटींचे दान साईभक्तांनी साईचरणी अर्पण केले आहे.
दरम्यान साईसंस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले की, भाविकांकडून मिळालेल्या देणगीतून संस्थान विविध भक्तोपयोगी व समाजोपयोगी कामे करते. साईसंस्थानचे साईनाथ रूग्णालयात निशुल्क तर साईबाबा रूग्णालयात माफक दरात वैद्यकीय उपचार करण्यात येतात. मोठ्या आजारांसाठी गोरगरीब रूग्णांना वैद्यकीय अनुदान देण्यात येते. प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात येते. वर्षाकाठी जवळपास दीड कोटी भाविक याचा लाभ घेतात. संस्थानच्या शैक्षणिक संकुलात सहा हजार विद्यार्थी नाममात्र दरात ज्ञानार्जन करत आहेत. भाविकांना माफक दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीतही संस्थान मदत करते. संस्थानात जवळपास सहा हजार कर्मचारी आहेत.
यंदाचं साईचरणी आलेलं दान
यंदा साईचरणी 400 कोटींचे दान आले असून यामध्ये दक्षिणापेटीत 166 कोटी, देणगी काउंटरवर 72 कोटी 26 लाख, डेबिट / क्रेडीट कार्ड द्वारे 41 कोटी, ऑनलाईन देणगीतून 82 कोटी, चेक, डीडी, मनिऑर्डरद्वारे 20 कोटी, सोने 25 किलो 578 ग्राम, चांदी 326 ग्रॅम, या दानाचाही समावेश आहे. दरम्यान शिर्डी साईबाबांना येणारे दान मग ते सोने चांदी असो कि रुपये पैसे हे स्वरूपात ते साई मंदिरातील दानपात्रात टाकले जाते. त्याच बरोबर देणगी काऊंटरवरही भाविक दान करुन रीतसर पावती घेतात. सोने चांदीचे मोठे दान जसे मुकूट, सवर्ण हार, भांडी, मंदिरातील वापराच्या वस्तू, अशा दानाचे साईसंस्थान टाकसाळकडून मुल्यांक केले जाते. यात घडवण्याची मजुरी धरली जात नाही. फक्त मूळ सोन्याची किमंतीच दानात जमा करतात.