Nashik News : नाशिक शहरातील (Nashik) मलनिस्सारण केंद्रांच्या आधुनिकीकरणाच्या 400 कोटीचा प्रस्तावाला अखेर हिरवा कंदील मिळाला असून लवकरच याचे काम सुरु होणार आहे.  ऑक्टाेंबर 2021 पासून पर्यावरण विभागाकडे (Enviroment Department) पडून असलेल्या प्रस्तावाला अखेर महापालिका आयुक्त (NMC Commissioner) तथा प्रशासक रमेश पवार यांच्या पाठपुराव्यानंतर हिरवा कंदील मिळाला आहे.


नाशिकमध्ये नव्याने आलेले रमेश पवार यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी कंबर कसली आहे. यासाठी ते वेळोवेळी गोदावरी नदी प्रदूषण संदर्भात पाठपुरावा करीत असतात. गोदावरी नदीत मिसळणाऱ्या नाल्यांची स्वता बोटीत बसून त्यांनी दोन तास पाहणी केली होती. आयुक्तांनी स्वत: लक्ष घातल्यानंतर पर्यावरण विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी आपल्या अध्यक्षतेखालील विविध विभागाच्या स्टेअरिंग समितीची मान्यता मिळवून दिली. दरम्यान, आता या प्रस्तावाला मंत्रीमंडळाची मान्यता घेवून केंद्र शासनाकडे राष्ट्रीय नदी संवर्धन याेजनेतून निधी मिळवण्यासाठी डिपीआर सादर केला जाणार आहे.


नाशिक महापालिका शहरातील तपोवन, टाकळी, चेहेडी आणि पंचक अशा चार एसटीपी प्लॅटचे लवकरच आधुनिकीकरण करणार आहे. त्यासाठी 400 कोटीच्या प्रस्तावाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) झाला असून केंद्रीय संचालनायाच्या मान्यतेनंतर निविदा काढली जाणार आहे. शहरातील तपोवन, टाकळी, चेहेडी आणि पंचक अशा चार मलनिस्सारण केंद्राचे अपग्रेडेशन होणार आहे. सध्या या केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया होते, पण त्याचा दर्जा चांगला नाही. 


त्यामुळे केंद्राची मान्यता मिळाल्यास गाेदावरी प्रदुषणमुक्तीच्या दृष्टीने माेठे पाऊल पडणार आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात आठ सिव्हरेज झोन तयार करण्यात आले आहेत. यातील प्रत्येक झोनमध्ये मलनिस्सारण केंद्र असून त्यांची क्षमता दिवसागणीक कमी हाेत आहे. दुसरीकडे, प्रदुषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभागाकडून नवनवीन मानके येत असून त्यानुसार पाण्यावर प्रक्रिया हाेत नसल्यामुळे वेळावेळी पालिकेला विचारण हाेत आहे. या मलनिसारण केंद्रांचे आधुनिकरण करण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी नाही. 


सद्यस्थितीत तपोवन, आगरटाकळी, चेहडी, पंचक व गंगापूर या पाच सिव्हरेज झोनमध्ये एकूण 360.50 एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र उभारण्यात आले आहेत. तसेच पिंपळगाव झोनकरीता 32 एमएलडी क्षमतेच्या मलनिस्सारण केंद्र उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शहरातील मलनिस्सारण केंद्रांची क्षमता 392.50 एलएलडीवर जाणार आहे. तथापी तपोवन, आगरटाकळी, चेहडी व पंचक या झोनमधील 342.50 एमएलडी क्षमतेच्या मलनिस्सारण केंद्रांची उभारणी 2015 पूर्वीची असून येथून नदीत साेडल्या जाणाऱ्या प्रक्रियायुक्त सांडपाण्याच्या गुणवत्ता समाधानकारक नाही.


असा आहे प्रस्ताव
नाशिक शहरातील तपोवन, आगरटाकळी, चेहडी व पंचक या चार मलनिस्सारण केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी 400 कोटींचा खर्च येणार आहे. यात आधुनिकीकरणावर प्रत्यक्ष 327.18 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून त्यानंतर पुढील पाच वर्षे या प्रकल्पांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी तब्बल 72.96 कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.


तीन रिसॉर्ट्सना नोटिसा
दरम्यान शहरात अनेक भागात मोठं मोठे रिसॉर्ट वसले असून काही रिसॉर्ट हे नदीच्या काठी आहेत. असे रिसॉर्ट सर्रास आपले सांडपाणी नदीत सोडत असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर मलजल व्यवस्थापन त्यावरील प्रक्रियेबाबत कोणत्याही उपाययोजना न केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंगापूर धरण परिसरात बांधकाम सुरू असलेल्या तीन रिसॉर्ट्सना नोटिसा बजावल्या आहेत. तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही दिवसांपूर्वी याच कारणासाठी सोमंडा विनियार्डलाही नोटीस बजावली होती.