Nashik News : गेल्या काही वर्षात मानसिक ताणतणाव (Mental Stress) अधिकच वाढला आहे. घर, कुटुंब, संसार, नोकरी, शिक्षण आदी घटकांमुळे धावपळीचे जगणं झालं आहे. दरम्यान अशा घटकांतून मानसिक ताणतणावांत अधिकच भर पडल्याचे जाणवते. कारण नाशिक (Nashik) जिल्ह्यात मागील अकरा महिन्यांत तब्बल 343 आत्महत्यांच्या (Suicide) घटना उघडकीस आल्या आहेत. 


नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून अनेकदा प्रेम, व्यसनांच्या आहारी जाणं, आजाराला कंटाळून, कौटुंबिक वादातून सामाजिक स्वस्थ बिघडत चालले आहे. अशातूनच आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. यामध्ये अधिकाधिक तरुण मुलामुलींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर धावपळीच्या जगण्यात मानसिक ताणतणाव वाढत असल्याने जानेवारीपासून ते नोव्हेंबर 2022 पर्यंत नाशिक जिल्ह्यात 343 आत्महत्यांचे प्रकार उघडकीस आले असून यामध्ये चिंतनशील बाब म्हणजे सर्वाधिक प्रमाण 14 ते 30 वयोगटांतील आहे. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात ज्या पद्धतीने कमालीचा बदल झाला आहे, त्यामुळे वैयक्तिक तसेच सामाजिक स्वास्थ बिघडण्याचे कारण असून शकते.  


दरम्यान आत्महत्या हा काही पर्याय नाही, मात्र आत्महत्या करण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मागील काही दिवसांतील आत्महत्या पहिल्या तर 14 ते 30 वयोगटातील मुलामुलींचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. हा वयोगट म्हणजे शिक्षण, नोकरी, लग्न आदींचा काळ आहे. सद्यस्थितीला अनेकजण नोकरीच्या शोधात आहे, अनेकांची लग्न जुळत नसल्याचे वास्तव आहे. या सगळ्यातून मानसिक ताणतणाव वाढत आहे. शिवाय अनेक दिवसांपासून बळावलेला आजार देखील आत्महत्येचे कारण ठरू शकतो. काही वेळा कौटुंबिक वादातून आत्महत्या घडल्याचे प्रकार समोर आले आहेत. विशेष म्हणजे या वयात प्रेम ही संकल्पना मनात रुंजी घालत असते. अशावेळी प्रेमभंगातून काही आत्महत्या झाल्याचे देखील घडले आहे. 


नाशिक जिल्ह्याचा आत्महत्यांचा आलेख पहिला असता जानेवारी महिन्यात 26, फेब्रुवारी 39, मार्च 44, एप्रिल 37, मे 45, जून 48, जुलै 47, ऑगस्ट 36, सप्टेंबर 28, ऑक्टोबर 24, नोंव्हेबर 26, डिसेंबर 16 (आतापर्यंत) म्हणजेच जवळपास 343 आत्महत्या मागील वर्षभरात झाल्याचे समोर आले आहे. तर यानुसार सर्वाधिक आत्महत्या या जून महिन्यात झाल्याचे दिसून येते. एकूणच मानसिक आजारांमध्ये आत्महत्येचे प्रमाण व त्याचबरोबर प्रयत्न जास्त प्रमाणात दिसून येतात. मागील दोन वर्षांचा कालखंड बघता तरुणांमध्ये ब्रेकअप, व्यसनाधीनता, नोकरीची चिंता आदी कारणांतून आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीला मानसिक आधार देणं महत्वाचे ठरते, त्याचबरोबर एखाद्या मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असतं. यामुळे टोकाचे पाऊल उचलण्यापासून रोखता येऊ शकते. 


आधार मिळणं महत्वाचं ... 
शिक्षण, नोकरी, कामधंदा, विवाह, प्रेम, मानसिक ताणतणाव, जबाबदाऱ्या, कुटुंब या घटकांमुळे अनेकदा मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता असते. अशावेळी जवळच्या व्यक्तीशी मोकळेपणाने संवाद साधणे आवश्यक ठरते. किंवा जवळच्या व्यक्तीच्या लक्षात आल्यास त्याने आधार देऊन व्यक्त होण्यास सांगावं.  अशा व्यक्तीला आपले मित्र, मैत्रीण, सहकारी, शिक्षक, पालक, नातेवाईक, शेजारी या नात्याने संबंधित व्यक्तीला समजून घ्यावे. त्याचे विचार जाणून घ्यावे. तुमचा एक मिनिट देखील एक आत्महत्या थांबू शकतो, असं मानसोपचार तज्ञांच मत आहे.