Nashik News : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यामुळे राज्यातील शिवसैनिक देखील आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. तर अनेक शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून शिवसैनिकांना नोटीस देण्यात आली आहे. 


शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात राजकीय वातावरण (Maharashtra Political Crisis) चांगलेच ढवळून निघालं आहे. गेल्या आठ दिवसांपासून शिंदे जवळपास 40 आमदारांना घेऊन गुवाहटीमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार संकटात आल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून आंदोलन केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून हि नोटीस बजावण्यात आली आहे. 


नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक असून मागील काही दिवसांत आंदोलने, तोडफोड, बॅनर फाडणे आदी प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नाशिकमधील वातावरण चिघळले आहे. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडता कामा नये, तसेच राज्यातील कायद्या सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांकडून शिवसैनिकांना नोटीस देण्यात आली आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप कार्यालयाची तोडफोड करणारे शिवसैनिक बाळा दराडे आणि दीपक दातिर यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 


दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा आठवा दिवस आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी समर्थक आमदारांसह शिंदे 21 तारखेला सुरतला पोहोचले. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जर सत्तांतर झाल्यास राज्यात शिवसेना भाजप संघर्ष वाढण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. तसेच राज्यात मोठा संघर्ष निर्माण होण्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती असल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. 


सत्तासंघर्ष टोकाला 
सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसीसंदर्भात उत्तर देण्यासाठी 12 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे हे राजकीय महानाट्य अजून लांबण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. अशातच भाजपकडूनही खलबतं सुरु आहेत. पण सध्या आमची भूमिका वेट अँड वॉचचीच, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून दिली जात आहे. अशातच आता हा सत्तासंघर्ष कोणतं वळण घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.