Nashik Accidents : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात सातत्याने अपघातांच्या घटना समोर येत आहेत. मागील वर्षभरात नाशिक शहरात 2022 मध्ये झालेल्या 461 अपघातांमध्ये 182 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओव्हरस्पीडिंग, रॅश ड्रायव्हिंग आणि हेल्मेटविना वाहन चालवणे ही अपघाताची कारणे असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.


नुकतंच 2022 हे थरारक वर्ष संपलं. या वर्षात नाशिक शहरात अपघातांच्या (Nashik Accident) घटनांनी गाजलं. नव्या वर्षातही अपघातांचे सत्र सुरूच आहे. अशातच नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City) संकलित केलेल्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2022 या वर्षात जवळपास 461 अपघात झाले असून 182 जणांचा मृत्यू झाले आहेत. म्हणजेच 2021 पेक्षा 2022 मध्ये सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. 2021 मध्ये 470 अपघातांमध्ये 185 लोकांचा मृत्यू झाला होता. 2022 मध्ये रस्त्यावरील मृत्यूपैकी 70 टक्के हे जास्त वेग, धोकादायक ड्रायव्हिंग आणि हेल्मेटशिवाय वाहन चालविल्यामुळे घडले आहे. 185 मृत्यूंपैकी 69 लोकांचा मृत्यू केवळ अतिवेगामुळे झाल्याचे पोलिसांच्या विश्लेषणातून समोर आले आहे. 


दरम्यान 2022  या वर्षात धोकादायक ड्रायव्हिंगमुळे 48 जणांचा मृत्यू झाला, तर 54 दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्याने जीवघेणे अपघात झाले. चुकीच्या बाजूने ड्रायव्हिंग केल्यामुळे इतर तिघांचा मृत्यू झाला असून फोनवर बोलत असताना अपघातात दोघांचा मृत्यू झाला. 461 अपघातांमध्ये 452 वाहनचालक किंवा पादचारी गंभीर जखमी झाले तर 94 किरकोळ जखमी होऊन बचावले. शहरात जवळपास 25 अपघातांचे ब्लॅकस्पॉट असून गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी मिर्ची हॉटेल चौकात झालेल्या भीषण अपघातात 13 जणांना जीव गमवावा लागला होता, त्यानंतर नाशिक महापालिकेने या ब्लॅकस्पॉट्सवर गतीरोधक उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली.


या पार्श्वभूमीवर नाशिक शहराचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले कि, "शहरातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. लोकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आणि स्वत:च्या सुरक्षेसाठी आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर सावधपणे वाहने चालवणेही आवश्यक आहे.” शहरातील रस्त्यांवर वाढत्या वाहनांच्या संख्येबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील रस्त्यांवर दरवर्षी हजारो नवीन वाहनांची भर पडत असते. शहरातील रस्त्यांचा वापर करणाऱ्या नाशिकबाहेरील वाहनधारकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. लोकांना वाहतुकीचे सर्व नियम पाळण्याची सवय लागावी, यासाठी शहरात विविध मोहिमा हाती घेण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.


मागील चार वर्षांची आकडेवारी... 


दरम्यान 2019 मध्ये 547 अपघातांमध्ये 540 जण जखमी झाले तर 2020 मध्ये 414 अपघातांमध्ये 364 जण जखमी 2021 मध्ये 470 अपघातांमध्ये 403 जण जखमी तर 2022 मध्ये 461 अपघात तर 546 जण जखमी झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.