Nashik Igatpuri Station : मुंबईचे (Mumbai) प्रवेशद्वार समजले जाणारे इगतपुरी (Igatpuri) हे शहर कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचे स्टेशन आहे. महाराष्ट्र व देशातील अनेक शहरे इगतपुरीशी रेल्वेच्या (Igatpuri Railway) माध्यमातून जोडली गेली आहेत. परंतु इगतपुरीला प्रत्यक्ष तांत्रिक थांबा असूनही अनेक गाड्यांना तिकीट बुकिंगची सुविधा नव्हती. याबाबत सुविधा उपलब्धतेसाठी अनेक दिवसांची मागणी पूर्णत्वाच्या मार्गावर असून सर्व तांत्रिक बाबी तपासून 17 गाड्यांना तिकीट बुकिंग सुरू (Ticket Booking) करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. 


कोरोनानंतर (Corona) इगतपुरीत आताही केवळ तीन गाड्यांना अधिकृत थांबा आहे. इतर गाड्यांना फक्त तांत्रिक थांबा असून कमर्शियल थांबा नसल्याने सर्वसामान्यांना त्याचा काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे आता सर्व तांत्रिक बाबी तपासून आता या सतरा गाड्यांना इगतपुरीहुन तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इगतपुरी रेल्वे स्थानकावर 17 मेल एक्सप्रेसला अधिकृत थांबा देण्यात आला असून त्यांची तिकीट आता मिळणार आहेत. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी याबाबत ट्विट केले असून प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.


दरम्यान तिकीट बुकिंगची सुविधा नसल्याने विद्यार्थी, व्यापारी आणि चाकरमान्यांना अनेक अडचणींना तोड द्यावे लागत होते. या बाबतीत इगतपुरीतील ज्येष्ठ नागरिकांसह व्यापाऱ्यांनी गाड्यांना तिकीट मिळावे, यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता 17 गाड्यांना तिकीट सुरू करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. इगतपुरी स्टेशनहून मुंबई, ठाणे, या सेवेचा फायदा स्थानिकांना जालना, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, पुणे, नाशिक, नागपूर इत्यादी शहरांना जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर हैदराबाद, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्यांदेखील अधिक आहे. त्यामुळे या सेवेचा फायदा स्थानिकांना होणार आहे. 


या गाड्यांची मिळणार तिकिटे


मनमाड-पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, सीएसएमटी मेल, नंदीग्राम एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, वाराणसी कामायनी एक्सप्रेस, महानगरी एक्स्प्रेस, भागलपूर एक्सप्रेस, पुष्पक एक्स्प्रेस भुसावळ-पुणे एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, अयोध्या एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांची तिकिटे इगतपुरी रेल्वे स्थानकात उपलब्ध होणार आहेत.