Nashik Murder : नाशिकच्या (Nashik) एकलहरे राेडवरील फर्निचर व्यावसायिक शिरीष गुलाबराव साेनवणे (Shirish Gulabrao Sonavane) यांच्या हत्येचे गूढ कायम असून मालेगाव तालुका (Malegoan Taluka) पाेलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन तपासासाठी नाशिकराेड (Nashikroad) पाेलिसांकडे वर्ग केला आहे. दरम्यान, घटनेला दोन दिवस होऊनही या हत्येशी (Murder) निगडीत कुणालाही ताब्यात घेण्यात आले नव्हते, तर मृत साेनवणे यांच्या दुकानासह कारखान्यातील सर्व कामगारांची पाेलिसांनी चाैकशी करुन जाबजबाब नाेंदवले आहेत. 


नाशिक शहराजवळील एकलहरे परिसरात बेंच बनविण्याचा कारखान्याचे संचालक शिरीष गुलाबराव सोनवणे हे बेपत्ता असताना त्यांचा मालेगावातील सायतरपाडे कालव्यात मृतदेह आढळला. त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले असताना मालेगाव तालुका पोलिसांत याप्रकरणी अपहरणानंतर खूनाचा गुन्हा अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध दाखल केला आहे. मात्र, दोन दिवस उलटूनही सोनवणे यांच्या हत्येचे गूढ कायम असून साेनवणे यांना नेणाऱ्या कारसह संशसितांचा माग नाशिकरोड पोलिस सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने काढत आहेत. सोनवणे हे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेपासून बेपत्ता होते. 


याप्रकरणी मध्यरात्री दोन वाजता त्यांच्या कारखान्यातील कर्मचारी फिरोज लतिफ शेख यांनी तक्रार दिली. नाशिकरोड पोलिसांची चार पथके तैनात झाली. मात्र, दुर्दैवाने शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मालेगाव तालुका पोलिसांना कालव्यात त्यांचा मृतदेह आढळला. रविवारी शवविच्छेदनानंतर त्यांची हत्या झाल्याचा संशय दाट झाल्याने त्यांचा भाऊ गजानन सोनवणे यांनी मालेगाव पोलिसांत फिर्याद दिली. शुक्रवारी दुपारी कारखान्यातून कारमध्ये आलेल्या तिघांनी अपहरण केल्याचा संशय आहे. त्यांनी कल्याण शहराचा उल्लेख असलेली पावती त्यावेळी फिरोजला दिली. त्यानुसार संशयितांचा माग काढत असून कारखान्यातील 10 ते 12 कामगारांची चाैकशी करुन जाबजबाब नाेंदविले जात असल्याची माहिती तपासाधिकारी तथा उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी साेमवारी दिली.



खूनाचा गुन्हा नाशिकरोडला वर्ग 
सोनवणे यांचे कुणाशीही आर्थिक वाद नसल्याचे समाेर येत असून उलट त्यांनाच अनेकांककडून पैसे घेणे बाकी हाेते. किरकाेळ स्वरुपाची अनेकांची उधार शिल्लक असून पैश्यांचा वाद नसल्याचे प्राथमिक तपासात समाेर येते आहे. अज्ञात कारणातून नियोजनबद्धरित्या मारेकऱ्यांनी हत्या केली आहे. हत्येत सहभागी संशयितांनी वापरलेल्या कारची माहिती पाेलिसांनी काढली आहे. मालेगावातील खूनाचा गुन्हा नाशिकरोडला वर्ग झाला आहे. वेगवेगळी तपास पथके रवाना असून कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवणे सुरू आहे. लवकरच तपास पूर्ण हाेईल अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे.