Nashik Accident : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील अनेक भागात रोजच अपघातांचे प्रमाण वाढत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाणही अधिक असल्याचे चित्र आहे. अशातच सिन्नर घोटी मार्गावर झालेल्या अपघातात दोन मायलेकांचा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर बंद अवस्थेत असलेल्या ट्रेलरकडे दुर्लक्ष केल्यानंतर शेवटी मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून दुचाकींचा अपघात झाल्याचे समोर आले. 


सिन्नर-घोटी मार्ग (Sinnar Ghoti Highway) अपघाताचे केंद्र बनत चालला आहे. सिन्नर (Sinnar) आणि घोटीला जोडणारा महत्वपूर्ण रस्ता असल्याने वाहनांची रोजच वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर अपघाताच्या (Accident) घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच सिन्नर घोटी महामार्गावर शिव नदीवरील पुलाच्या वळणावर ट्रेलर उलटून झालेल्या अपघातात ट्रेलरखाली दुचाकी दबल्याने तालुक्यातील सोनांबे येथील मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथील मायलेक सिन्नरहून घरी परतले नसल्याने त्यांचे मोबाइल लोकेशन तपासल्यावर ते वळणावर उलटलेल्या ट्रेलरखाली दबल्याचे लक्षात आले. 


दरम्यान, अपघातानंतर (Accident) ट्रेलर चालक फरार झाल्याने प्रारंभी केवळ ट्रेलर उलटला असल्याचे आणि त्यात कुठलीही जीवितहानी नसल्याची माहिती पोलिसांपर्यंत होती. शुक्रवारी पहाटे चार वाजता त्यांचे मृतदेह ट्रेलरखालून बाहेर काढले. बिलकिस हमीद शेख आणि आरमान हमीद शेख अशी अपघातात ठार झालेल्या मायलेकाची नावे आहेत. दोघेही दुचाकी वरून गुरुवारी दुपारी सिन्नर (sinner) येथे बाजारासाठी आले होते, घरी परतताना त्यांनी कुटुंबीयांना सिन्नरहून निघाल्याचे मोबाईल वरून सांगितले होते. त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता. या घटनेमुळे सोनांबे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


असा झाला अपघाताचा उलगडा 


दरम्यान रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तपासाला सुरवात करत त्यांचा मोबाइल ट्रॅक केला केला. यावेळी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मोबाइलचे लोकेशन (Mobile Location) शिव नदीच्या वळणावर उलटलेल्या ट्रेलरच्या परिसरात निघाल्याने पोलिसांचा संशय बळावला. अपघात होऊन दुचाकी या ट्रेलरखाली दबली असावी, असा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केली. लागलीच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. उशिरा अपघातस्थळी क्रेन बोलावून कंटेनर आणि त्यातून पडलेले पुठ्याचे गठ्ठे बाजूला करण्याचे काम हाती घेतले. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या ट्रेलरखाली दुचाकीसह मायलेकांचे मृतदेह आढळले.