Shani Amavasya 2023 : आज शनी अमावास्या (shani Amavasya) असल्याने अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (Shani Shingnapur) मंदिरात भाविकांची मांदियाळी असून नाशिकच्या नांदगाव (Nandgaon) येथील नस्तनपूर शनिमंदिरातही दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केल्याचे चित्र आहे. शनी अमावस्येच्या दिवशी दर्शन घेतल्यास आपल्यावर येणारी संकट दूर होतात, अशी धारणा शनीभक्तांमध्ये आहे. त्यामुळे दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने शनी शिंगणापूरसह नस्तनपूरला दर्शनासाठी दाखल होत असतात.


शनी आमावस्येनिमित्ताने शनी शिंगणापूर येथे भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शनिभक्त शनी शिंगणापूध्ये दाखल झाले आहेत. मात्र पंढरपूर (Pandharpur) पालखी सोहळा सुरु असल्याने यंदा भाविकांची संख्या कमी असल्याचे देवस्थान ट्रस्टने सांगितले आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन दर्शन रांगेमध्ये मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शनी अमावस्येच्या दिवशी दर्शन घेतल्यास आपल्यावर येणारी संकट दूर होतात, अशी धारणा शनीभक्तांमध्ये आहे. त्यामुळे दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने शनी शिंगणापूरमध्ये दर्शनासाठी दाखल होत असतात. 


तर शनीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या नाशिकच्या (Nashik) नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर (Nastanpur Shani Mandir) येथे आज शनी अमावस्येनिमित्ताने लाखो शनिभक्त दर्शनासाठी गर्दी केली आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या व साडेतीन शनी पिठापैकी एक असलेले संपूर्ण पीठ नस्तनपूर. प्रभू रामचंद्र सीतामाईंच्या शोधात निघालेले असताना प्रांतकाळी स्नानानंतर सूर्याला अर्घ्य देताना येथील शनी देवाची वालुकामय मूर्ती प्रभू रामचंद्रांच्या हाती लागल्यानंतर श्री.क्षेत्र नस्तनपूर येथे या मूर्तीची स्थापना करण्यात आली असल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे लाखो भाविक शनी अमावस्येला येथे दर्शनासाठी येत असतात. अमावस्या कालावधीत शनीदेवाचे दर्शन घेतल्याने शनिदेवाची कृपादृष्टी लाभते अशी धारणा असल्याने अमावस्या कालावधीत दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.


नस्तनपूरला भाविकांची गर्दी 


नांदगाव (Nandgoan) तालुक्यातील नस्तनपूर (Nastanpur Shani Mandir) येथील शनिमंदिरात नाशिकसह जिल्ह्यातील असंख्य भाविक या दिवशी दर्शन घेण्यासाठी येतात. या दिवशी यात्रेसह शनिदेवाची भव्य मिरवणूक काढली जाते. शनी अमावस्याव्यतिरिक्त सर्व शनिवारी शनिदेवाची पूजा करणे अत्यंत अनुकूल मानले जाते. नांदगावपासून अवघ्या सात किलोमीटरवर असलेले नस्तनपूर हे गाव हायवेवरच आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. नस्तनपूर संस्थानकडून भाविकांना पार्किंगसाठी किल्ला वाहनतळ व मुख्य प्रवेशद्वार वाहनतळ अशा दोन प्रकारचे अद्ययावत वाहनतळाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 


शनी अमावस्येचे महत्व 


प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. पूर्वजांच्या दान आणि उपासनेसाठी ही तारीख खूप महत्वाची मानली जाते. पण जेव्हा अमावस्या शनिवारी पडते, तेव्हा ते आणखी विशेष मानले जाते आणि त्याला शनैश्वरी अमावस्या म्हणतात. अशा अमावस्येला पूर्वजांच्या आशीर्वादासह, शनिच्या जातकांचा आणि ग्रस्त असलेल्या लोकांना विशेष लाभ होतो, असं सांगितलं जाते.