Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात ३ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यानुसार शिक्षण, महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने शाळाबाह्य मुलांना शोधण्यात येत असून घरी जाऊन या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आजपासून मोहीम सुरु करण्यात आली आहे.


कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष बंद असलेल्या शाळा व देशपातळीवरील लॉकडाऊन मुळे रोजगाराच्या शोधार्थ स्थलांतरित झालेल्या मजुरांमुळे मोठ्या प्रमाणावर मुले शाळाबाह्य झाली असल्याचे समोर आले आहे. अशा सर्व मुलांना त्यांचा शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी आजपासून 'मिशन झिरो ड्रॉप आउट' सुरू करण्यात आले आहे. दरम्यान या मोहिमेत घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात येणार असून त्यांना सन्मान शाळेत दाखल करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल, ग्रामीण विकास, नगर विकास, सामाजिक न्याय, महिला व बालविकास आदिवासी विकास विभागांवर सोपवण्यात आली आहे. 


दरम्यान राज्य सरकारने मार्च 2020 मध्ये शाळाबाह्य मुले शोधण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र ही मोहीम सुरू होताच कोरोनाचा शिरकाव झाल्याने शाळाबाह्य मुलांचा शोध घेता आला नाही. त्यामुळे तीन ते अठरा वयोगटातील मुलांच्या शोधासाठी मिशन झिरो ड्रॉप आऊट हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीतील जन्माची नोंद यासाठी तपासण्यात येणार असून अशा बालकांना नजीकच्या शाळेत तत्काळ दाखल करण्यात येणार आहे. 


तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांतून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात कुटुंबे स्थलांतर करीत असतात. त्यामध्ये शहर, रेल्वे स्टेशन, बस स्थानके, ग्रामीण भागातील बाजार, गावाबाहेरची पालं, वीटभट्ट्या, दगडखाण, कोळसा खाणी, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय स्थलांतरित कुटुंबे, झोपड्या आदी ठिकाणी हि कुटुंबे वास्तव्यास असतात. कुटुंबासोबत मुलेही या काम अथवा खेळात असतात. परिणामी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. त्यामुळे अशा ठिकांणावरील मुलांचा शोध घेण्यात येणार आहे. विशेषकरून ३ ते ६ वयोगटातील जी बालके एकात्मिक बाल विकास योजनेचा लाभ घेत नाहीत. खासगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे ज्युनिअर केजी, सीनिअर केजीमध्ये जात नाहीत. अशा शाळाबाह्य बालकांची शोधमोहीम घेण्यात येणार आहे. 


नाशिकच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी म्हणाल्या कि, शिक्षणाच्या प्रवाहात सगळ्याना घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी दरवर्षीं शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केले जाते. शिअवय मागील दोंन वर्ष कोरोना काळात गेल्याने अनेक मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. त्यामुळे हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सामाजिक जाणीवेतून आपल्या परिसरातील कोणतेही मूल शाळाबाह्य असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नजीकच्या अंगणवाडी शाळा ग्रामपंचायत कार्यालयाला माहिती द्यावी जेणेकरून एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.