Nashik Startup : मुंबई-पुण्यानंतर (MUmbai-Pune) आता नाशिकही (Nashik) लवकरच स्टार्टअपच्या शर्यतीत अग्रेसर असून सद्यस्थितीत नाशिकमध्ये 204 स्टार्टअप (StartUp) असून राज्यात चौथे स्थान गाठले आहे. त्यामुळे नाशिक लवकरच स्टार्टअपच्या दृष्टीने राज्यात अनेक नव उद्योजकांना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. 


नाशिक शहरात स्टार्टअप साठी साजेसे वातावरण असून संरक्षण, शेती, मनोरंजन, उद्योग या क्षेत्रांशी संबंधित गुंतवणूक करण्यास मोठ्या प्रमाणात वाव असल्याने, नाशिकमध्ये स्टार्टअपच्या दृष्टीने अधिकाधिक संधी उपलब्ध होताना दिसतं आहेत. सातपूर (Satpur), अंबड सारख्या औद्योगिक वसाहती असल्याने रोजगार वाढला असून नव संकल्पना आत्मसात केल्या जात आहेत. यासाठी नवे उद्योजक तयार होत आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यात स्टार्टअपची संख्या वाढत आहे. नाशिकने गेल्या दोन वर्षात 204 स्टार्टअपची नोंदणी केली असून राज्यात नाशिक चौथ्या क्रमांकावर आले आहे. 


दरम्यान डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड (DPIIT) द्वारे जारी केलेल्या अहवालानुसार, 2016-17 पासून महाराष्ट्राने वेगवान स्टार्टअप वाढ पाहिली आहे. केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया योजनेमुळे राज्यातील स्टार्टअप परिस्थितीला चालना मिळाली आहे. ग्रामीण भागातील तरुण उद्योजक नाविन्यपूर्ण संकल्पनेसह त्यांचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी पुढे येत आहेत. आर्थिक अडचणी असूनही अनेक स्टार्टअप यशस्वी होतात. सध्या राज्यात 13,519 मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. 2016 मध्ये राज्यात फक्त 86 स्टार्टअप होते. 2017 मध्ये ही संख्या 1,058 पर्यंत वाढली, 2018 मध्ये ती वाढून 1,620 झाली, 2019 मध्ये 2,129 स्टार्टअप्स, 2020 मध्ये 2,685, 2021 मध्ये 3,721 आणि 2022 मध्ये 2,220 स्टार्टअप्स मंजूर झाले. देशात 72,993 स्टार्टअप्स DPIIT नुसार देशात 72,993 स्टार्टअप्स आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बंगलोर, पुणे आणि अहमदाबाद या शहरांमध्ये एकूण 34,473 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. तसेच, 50 टक्क्यांहून अधिक स्टार्टअप्स टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये आहेत. 2016 मध्ये देशात केवळ 471 स्टार्टअप होते.


राज्यातील स्टार्टअप्स :
राज्यातील महत्वाच्या शहरातील स्टार्टअपची आकडेवारी पाहिली असता हळूहळू सर्वच जिल्हे स्टार्टअपच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. यामध्ये पुणे 1,797, मुंबई : 1,750,  ठाणे : 870, नागपूर : 268, नाशिक : 204, रायगड : 166, पालघर : 71, कोल्हापूर : 75, औरंगाबादने गेल्या दोन वर्षांत 155 स्टार्टअप्सची नोंदणी करून राज्यात आठवा क्रमांक पटकावला आहे. मराठवाड्यात 232 स्टार्टअप आहेत. महाराष्ट्रात एकूण 13,519 नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत. बीडमध्ये नोंदणीकृत स्टार्टअप्सची संख्या 12 आहे, 2021 मध्ये एकही स्टार्टअप नसलेल्या हिंगोलीमध्ये 2022 मध्ये चार नवीन स्टार्टअप्सची नोंदणी झाली आहे, जालन्यात 11 स्टार्टअप्स आहेत, नांदेडमध्ये 28 स्टार्टअप आहेत, उस्मानाबादमध्ये 10 आणि परभणीमध्ये 12 स्टार्टअप आहेत.


मराठवाड्याची सातत्यपूर्ण प्रगती
महाराष्ट्रातील स्टार्टअपच्या वाढीला 2016 मध्ये सुरुवात झाली. राज्य सरकारने ग्रामीण भागात स्टार्टअपबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी स्टार्टअप यात्रा देखील सुरू केली आहे. तरुण उद्योजकांना अशा उपक्रमांचा फायदा झाला आहे, विशेषत: मराठवाड्यातील ग्रामीण भागातील तरुण जे तळागाळातील उद्योजक आहेत आणि त्यांच्या स्टार्टअपद्वारे कृषी उद्योगात बदल घडवत आहेत. स्टार्टअपची संख्या आशादायक आहे आणि नजीकच्या भविष्यात ती वाढेल, असे मॅजिकचे संचालक आशिष गर्दे यांनी सांगितले. 


जिल्ह्यात नाविन्यता स्टार्टअप यात्रा 
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअपच्या विकासासाठी पोषक वातावरण निमिर्ती करून त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत नाव संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र व स्टार्टअप नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.