Nashik News : त्रिरश्मी येथील लेणीवर (Trirashmi Leni) मायलेक कोसळून जखमी झाले. तसेच अंकाई किल्यावर (Ankai fort) गेलेल्या दोन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र तरीदेखील पर्यटक धोका पत्करून पर्यटन करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे जिल्हा प्रशासनाने नाशिकच्या (Nashik) पर्यटनस्थळांवर बंदी (Tourist Spot) घातली असताना विकेंडला मोठी गर्दी होऊन पर्यटकांनी प्रशासनाच्या आदेशाला हरताळ फसल्याचे दसून आले.
नाशिकच्या दुगारवाडी (Dugarwadi waterfall) धबधबा परिसरात 21 पर्यटक अडकून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सदर दुगारवाडी धबधबा तसेच प्रसिद्ध हरिहर किल्ल्यावर (Harihar fort) पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. ही बंदी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू आहे. मात्र तरी देखील विकेंडला पर्यटकांची हरिहर किल्ल्यावर गर्दी होत असल्याची बाब पुढे आली आहे येथील. त्यामुळे बंदी असतानाही पर्यटकांची पावले हरिहरकडे येत आहेत. मात्र याकडे वनविभागासह प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसते आहे.
नाशिक शहरात अनेक पर्यटन स्थळे असून सध्या पावसाचे दिवस असल्याने राज्यभरातून पर्यटक त्र्यंबकसह नाशिक येथील पर्यटन स्थळांना भेटी देत असतात. मागील आठवड्यात पर्यटकांचा ग्रुप दुगारवाडी धबधब्यावर गेला असता या ठिकाणी अडकून पडला. जिल्हा प्रशासनाच्या ,मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोहचत अथक प्रयत्नानंतर या पर्यटकांची सुटका करण्यात आली. मात्र यात एका पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला. यानंतर सदर घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने संबंधित ठिकाणांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली. त्याचबरोबर हरिहरला देखील जाण्यास मज्जाव करण्यात आला मात्र या आदेशानंतर दोन विकेंड सरले तरी येथील पर्यटनावरील बंदीची अंमलबजावणी होऊ शकली नसल्याचे दिसू लागले आहे.
आदेशाची अंमलबजावणी कधी?
दरम्यान मागील आठवड्यातील वीकेण्डला म्हणजेच शनिवार रविवारी पर्यटकांनी हरिहर किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडल्यास कोण जबाबदार असा प्रश्न? या निमित्ताने उपस्थित झाला आहे. एकीकडे पर्यटन स्थळावर बंदी घातली असताना पर्यटक मात्र बंदी झुगारून पर्यटन स्थळांवर जीव धोक्यात घालून पर्यटन करत आहेत. तर दुसरीकडे प्रशासन बंदीचे आदेश देऊनही पर्यटकांना रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पर्यटन बंदी फक्त कागदावरच का असेही बोलले जात आहे. प्रशासनाच्या आदेशानंतर वनविभागाकडूनही अपेक्षित दखल घेण्यात आल्याचे दिसत नाही.
पर्यटकांकडून हरताळ
दरम्यान दुगारवाडीच्या घटनेनंतर प्रशासनाने कठोर पाऊले उचलत दुगारवाडी आणि हरिहर पर्यटकांना बंदी घालण्यात आली. मात्र बंदी घातली असताना देखील पर्यटक सर्रास या ठिकाणी भेटी देत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वनविभाग आणि प्रशासनाने याबाबत कारवाई अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.