Lasalgaon Bajar Samiti : जागतिक बँक (World Bank) अर्थसहाय्यित  बाळासाहेब ठाकरे कृषी व्यावसायिक आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्यभरातील 12 बाजार समिती यांची 2021-22 या वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालक संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यात राज्यातील 305 बाजार समित्यांमधून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीने पहिला क्रमांक पटकावला आहे. 


राज्यात स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांचे मुल्यांकन करून राज्यभरातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये लासलगाव बाजार समितीच्या सन 2021-22 या वर्षाच्या वार्षिक कामगिरीची पाहणी करून वार्षिक क्रमवारीत लासलगाव बाजार समितीचा प्रथम क्रमांक आला आहे. तर पहिल्या 10 क्रमांकात नाशिक जिल्ह्यातील दोन बाजार समित्यांचा समावेश असून दहाव्या क्रमांकावर पिंपळगाव बसवंत बाजार समिती आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीने दुसरा तर वाशिम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीने तिसरा क्रमांक मिळवला आहे. नाशिक विभागातील संगमनेर बाजार समितीने 157 गुण मिळवत चौथा क्रमांक मिळवला आहे अशी माहिती राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांनी दिली.


दरम्यान लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या 75 वर्षांमध्ये शेतकरी बांधव व इतर बाजार घटकांसाठी उभारणी केलेल्या विविध पायाभूत सुविधा आणि शेतकरी बांधवासाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या विविध योजना, उपक्रम यातील कामगिरीवरून राजस्तरीय क्रमवारीत लासलगाव बाजार समितीस प्रथम क्रमांकाचे मानांकन निश्चित करण्यात आले. दरम्यान या निवडीनंतर बाजार समिती सभापती , संचालक मंडळ व शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला. लासलगाव बाजार समिती कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, निफाड, येओला, पिंपळगाव बसवंत आदी परिसरातील शेतकरी लाखोंचा माल लासलगाव कृषी बाजार समितीत आणत असतात. यातून करोडोंची उलाढाल होत असते. 


अशी केली जाते निवड 
दरम्यान राज्यामध्ये प्रथमच अशा प्रकारे बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन हा स्मार्ट प्रकल्प सुरू आहे स्मार्ट प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी बाजार समिती यांची कामगिरीवर आधारावर वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध करणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. क्रमवारी निश्चित करण्यासाठी जागतिक बँकेच्या सूचनेनुसार 200 गुणांसाठी 35 निकष तयार करण्यात आले होते. राज्यातील 305 बाजार समित्यांमधून पहिला क्रमांक मिळणे ही आनंदाची बाब असून या यशात बाजार समितीतील सर्वच घटकांचे योगदान आहे. सभापती म्हणून गेली तीन वर्षे कामकाज करताना अनेक उपयुक्त निर्णय घेतले. त्याचे अनुकरण व इतर बाजार समिती यांनी केले असल्याचे लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्ण जगताप यांनी सांगितले. 


लासलगाव बाजार समितीला 200 पैकी 163 गुण 
दरम्यान क्रमवारीत पायाभूत सुविधा व इतर सेवा सुविधा निकष आर्थिक कामकाज वैधानिक कामकाज व इतर निकष यांच्या आधारे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीने 163 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर पिंपळगाव बाजार समितीने 148 गुण मिळवून दहावा क्रमांक मिळवला जिल्ह्यातील अन्य बाजार समिती आणि त्यांनी मिळाले राजश्री क्रमांक येवला 16, नामपुर 24, सिन्नर 30, चांदवड 34, नाशिक 35, घोटी 40, देवळा 45, कळवण 46, नांदगाव 49, दिंडोरी 56, मालेगाव 76, मनमाड 79, उमराणे 89, सुरगाणा 160 अशी अनुक्रमे क्रमांकाने निवड झाली आहे.