Nashik Ganeshotsav : नाशिक (Nashik) महानगरपालिकेतर्फे शहरातील विसर्जन स्थळे (Ganesh Immersion) आणि मिरवणूक मार्गावर प्राधान्याने लक्ष देऊन विविध कामे पूर्ण केली जात आहेत. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Nashik Commissioner) यांचे मार्गदर्शन आणि सुचनेनुसार महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या अधिका-यांनी शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली.
नाशिक शहरात गणेशोत्सव (Ganeshotsav) जोरदार सुरु असून दोन दिवसांवर आलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सर्वच प्रशासन तयारी करीत आहेत. यामध्ये मनपा प्रशासन, नाशिक पोलीस इतर प्रशासनाची तयारी सुरु आहे. दरम्यान नाशिक मनपाकडून (Nashik NMC) गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात येऊन ठिकठिकाणी रस्त्यांच्या झालेली दुरावस्था याची दुरुस्ती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सारडा सर्कल येथील वाकडी बारव ते गौरी पटांगण दरम्यान चार किलोमीटर मार्गाची पाहणी केली. पंचवटी भागातील मालेगाव स्टॅण्ड सिग्नल, इंद्रकुंड, होळकर ब्रिज, गौरी पटांगण, नांदूर घाट येथे सुरु असलेल्या कामांची समक्ष पाहणी करुन सुचना करण्यात आल्या. या ठिकाणी स्मार्ट सिटीकडून होणा-या कामांबाबत सीईओ सुमंत मोरे यांच्याशी शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी चर्चा केली. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दुसरीकडे पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर, मुख्य लेखापरीक्षक बोधीकरण सोनकांबळे यांनी लक्ष्मीनारायण घाट आणि कृत्रिम तलावांची पाहणी केली. पंचवटी भागात शिंदे नगर ते ड्रीम कॅसल चौक या मार्गावरील खड्डे बीबीएम मटेरीअलने बुजवण्यात आले आहेत. पश्चिम विभागात रविवार कारंजा परिसर , शालिमार परिसर येथे खड्डे भरुन पॅच वर्क करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 16 मधील संगम घाटकडे जाणारा रस्ता दुरुस्ती करण्यात आली आहे. सातपूर-अंबड लिंक रोड येथील गणेश विसर्जन स्थळ ठिकाणी मंडप टाकणे, पाण्याचे कुंड ठेवणे ही कामे करुन परिसराची साफ सफाई करण्यात आली आहे. सातपूरमधीलच प्रभाग क्रमांक 10 येथील त्रंबक रोड, प्रभाग क्रमांक 08 येथील विश्वास बँक, प्रभाग क्रमांक 26 मधील आयटीआय पुल खुटवड नगर रस्ता येथील रस्ता दुरुस्ती करण्यात आली आहे.
नवीन नाशिक विभागात उंटवाडी रोड, पाथर्डी फाटा तसेच पूर्व विभागात इंदीरानगरातील चार्वाक चौकात, प्रभाग क्रमांक 23 वृंदावन नगर, प्रभाग क्रमांक 24 येथील सद्गुरु नगर आणि तपोवन रोडवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले आहेत. याच विभागातील प्रभाग क्रमांक 15 मधील सोनजे मार्गावर रस्ता दुरुस्ती झाली आहे. तसेच मखमलाबाद मार्गावरील खड्डे बीबीएम मटेरीअलने बुजवण्यात आले आहेत.
असा असेल मुख्य गणेश मिरवणूक मार्ग
नाशिकच्या शहरातील चौक मंडईतून वाकडी बारवमार्गे कादर मार्केट, फुले मार्केट, अब्दुल हमीद चौक, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉईंट, सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजामार्गे मालेगाव स्टँडवरून म्हसोबा पटांगणकडे मिरवणूक जाईल.