Chhagan Bhujbal : येवला (Yeola) मतदारसंघातील सुरु असलेली महावितरणची (Mahavitran) कामे तातडीने पूर्ण करण्यात येऊन प्रस्तावित कामांचे प्रस्ताव सादर करण्यात यावेत. तसेच नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने कामात दिरंगाई करणाऱ्या आणि ग्राहकांशी बेशिस्तपणे वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.



राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात येवला मतदारसंघातील कृषी धोरण 2020 ACF अंतर्गत मंजूर असलेल्या महावितरणच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांनी कृषी धोरण 2020 ACF अंतर्गत मंजूर असलेली येवला व निफाड तालुक्यातील नगरसूल व कोटमगाव क्षमता वाढ, अंगुलगाव, बल्हेगाव, कुसूर, सोमठाण देश तर निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव, मरळगोई येथील अतिरिक्त 05 एमव्हीए रोहित्र, सुधारित वितरण क्षेत्र योजना-सुधारणा-अधिष्ठित आणि निष्पत्ती-आधारित योजने अंतर्गत चिचोंडी औद्योगिक वसाहत, पिंपळगाव जलाल येथे 05 एमव्हीए चे नवीन विद्युत उपकेंद्र, भरवस फाटा येथे नवीन विद्युत उपकेंद्र, येवला येथे 05 एमव्हीए ऐवजी 10 एमव्हीए चे रोहित्र बसविणे, येवला ग्रामीण 35 नवीन रोहीत्र, येवला शहर 23 नवीन रोहीत्र, खडकमाळेगाव, विंचूर उपकेंद्रात नवीन 11 के.व्ही. लिंक लाईन, देवगाव व लासलगाव ग्रामीण-51 नवीन रोहीत्र, सारोळा विंचूर वाकद नवीन रोहित्र बसविणे या कामांसोबत प्रस्तावित असलेली जउळके येथे 5 एमव्हीए चे नवीन विद्युत उपकेंद्र, मानोरी येथे नवीन फिडर या विविध कामांचा आढावा घेतला.


येवला मतदारसंघातील नगरसूल, अंगूलगाव,मरळगोई, खडक माळेगाव येथील विद्युत उपकेंद्राच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सदर प्रस्ताव अंतिम मजुरीसाठी दाखल करण्यात आले असून येवला ग्रामीण व शहरी भागात नवीन 42 आणि 18 रोहीत्रांची कामे पूर्ण करण्यात आलेली आहे. तसेच खडकमाळेगाव येथील उपकेंद्रात नवीन 11 केव्ही लाईन टाकण्याच्या कामाची मंजुरी पूर्ण झाली आहे. देवगाव लासलगाव परिसरातील 36 रोहीत्रांचे काम पूर्ण झाली असून मानोरी येथे नवीन फिडरचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांना यावेळी दिली.


यावेळी छगन भुजबळ यांनी सुधारित वितरण क्षेत्र योजना-सुधारणा-अधिष्ठित आणि निष्पत्ती-आधारित योजने अंतर्गत प्रस्तावित तसेच कृषी धोरण 2020 ACF अंतर्गत प्रस्तावित कामे प्राधान्याने मार्गी लावण्यात येऊन मतदारसंघातील रखडलेली महावितरणची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच महावितरणच्या कामांबाबत अधिक तक्रारी दाखल होत असल्याने अधिकाऱ्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत कामात दफ्तर दिरंगाई खपवून घेणार नाही असा इशाराही अधिकाऱ्यांना दिला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत तक्रारी असलेल्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


पाणी पुरवठा योजनेच्या विजेचा प्रश्न निकाली 
लासलगाव-विंचूरसह 16 गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज खंडीत झाली की रिटर्न पाण्याचा दाब येतो आणि पाईपलाईन लिकेजचे प्रमाण वाढून पाणी पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत राहण्याठी 24 तास विद्युत कनेक्शन सुरु ठेवण्यात यावे अशा सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना मागील आठवड्यात केल्या होत्या. या ठिकाणी विजेचे संयंत्र बसवण्याचे काम आज पूर्ण करण्यात येईल अशी माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली. त्यामुळे योजनेचा पाणी पुरवठा खंडित न होता पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.