Nashik Modkeshwer Mandir : गणेश आकाशमार्गाने भ्रमण करत असताना त्यांच्या हातातील एक मोदक खाली पडला, त्यापासून गणेशरूप (Ganapati Bappa Morya) मूर्ती साकार झाली. त्याचा दृष्टांत येथील क्षेमकल्याणी घराण्यातील पूर्वजांना झाला. त्यानुसार त्यांनी या मंदिराची उभारणी केली, आणि मोदकेश्वर उभे राहिले, अशी आख्यायिका मोदकेश्वर गणेशाची सांगितली जाते.


नाशिक (Nashik) जिल्हा हा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. शहरात अनेक भागात मंदिरेच मंदिरे पाहायला मिळतात. त्यात गणेश मंदिराचा वेगळाच इतिहास वाचायला मिळतो. नाशिकच्या गोदा तीरावरील मोदकेश्वर गणेशाचे मंदिर पाहायला मिळते. आजही हे मंदिर सुस्थितीत असून या मंदिराची स्थापनेचा निश्चित कालावधी नसला तरी साधारण चारशे ते पाचशे वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. 


नाशिक शहरातील प्रसिद्ध असलेल्या गोदावरीच्या तीरावर (Godavari) गाडगेबाबा महाराज धर्मशाळेजवळ हे मंदिर असून मोदकेश्वर गणपती (Modkeshwer Ganpati) देवस्थान अतिशय पुरातन असून त्याचे इतिहास व स्थान प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. नाशिकचे ग्रामदैवत म्हणून मोदकेश्वर गणपतीला म्हणून ओळखला जातो. गणेशकोश, पंचवटी-यात्रा दर्शन, गोदावरी माहात्म्य यात मोदकेश्वराचा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध 21 गणपती क्षेत्रांत मोदकेश्वराची गणना होते. गोदावरीच्या पश्चिम तीरावर, नाव दरवाजाजवळ हे स्वयंभू गणेशाचे मंदिर आहे. 


नाशिककरांचे ग्रामदैवत असल्याने अनेक भाविक शुभकार्याप्रसंगी, कार्यारंभी दर्शनासाठी येतात. दर महिन्याची संकष्टी चतुर्थी, भाद्रपद आणि माघातील उत्सवाच्या वेळी विविध अलंकारांनी मोदकेश्वराला सजविले जाते. गणेशोत्सवात मंदिराला आकर्षक रोषणाई केली जाते. त्या काळात विशेष महापूजेचे आयोजन केले जाते. भाविकांना प्रसाद म्हणून मोदक दिला जातो. 



अशी आहे मोदकेश्वर गणेश मूर्ती 
मोदकेश्वर मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून मूर्तीचा मोदका सारखा आकार असल्याने मंदिराला मोदकेश्वर गणेश मंदिर हे नाव पडले. मंदिराला तीनशे ते चारशे वर्षांचा इतिहास असल्याने मंदिरातील काही भाग पुरातन इतिहासाची साक्ष देतो. तर चार खांब असलेल्या गाभाऱ्यात शेंदूर विलेपित मोदकेश्वर विराजमान आहे. मागील बाजूस रिद्धी-सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. मोदकेश्वराच्या बाजूलाच विश्वेश्वर महादेव आहे. पिता-पुत्रांचे इतके जवळचे सान्निध्य असणे हे या मंदिराचे वैशिष्टय़ आहे. याबरोबरच बाजूलाच इतर देवतांच्या छोटय़ा छोटय़ा मूर्ती आहेत. प्रात:काळी सूर्यकिरण मोदकेश्वरावर येत असल्याने हे चित्र विलोभनीय असते.


अशी आहे आख्यायिका
मोदकेश्वर या नावामागे रोचक आख्यायिका सांगितली जाते. एकदा गणेश आणि स्कंद यांच्यात मोदकावरून जोरदार भांडण झाले. यावेळी महादेवाने त्यांच्यातील वादावर तोडगा काढत त्यांची परीक्षा घेतली. या परीक्षेत गणेश पास झाले. यानंतर गणेशाला तो मोदक प्राप्त झाला. हाच मोदक हातात घेऊन गणेश भ्रमण करत असताना नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठाने जात असताना त्याच्या हातातील मोदक खाली पडला. मोदकासाठी परीक्षा द्यावी लागली होती, शिवाय आवडता पदार्थ असल्याने तो खाली पडल्यामुळे गणेश खाली उतरला, याची आठवण रहावी म्हणून गणेशाने स्वयंभू गणेशमूर्तीच्या स्वरुपात तेथे वास्तव्य केले. पुढे हेच ठिकाण मोदकेश्वर मंदिर म्हणून प्रचलित झाले.