CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाण्यात (Thane) असताना नाशिक (Nashik) शहराच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले आहे. नाशिक आणि दिंडोरीचे (Dindori) नगरसेवक माझ्यासोबत असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यानंतर कामाचा सपाटा लावला आहे. सध्या राज्यात अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने ते त्या त्या भागात पाहणी दौरे करीत आहेत. दरम्यान आज गुरू पौर्णिमेनिमित्त ते ठाण्यात होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पत्रकारांनी त्यांना नगरसेवक शिंदे गटात सामील होत असल्याबाबतचा प्रश्न विचारला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईमधील (Mumbai) अनेक नगरसेवक, पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. त्याचबरोबर नाशिक, दिंडोरी येथील नगरसेवक देखील सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी खासदर संजय राऊत (Sanjay Raut) हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी करीत शिवसेनेचे सर्व नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. शिवाय एकही नगरसेवक बाजूला जाणार नाही, असा आश्वासक इशारा देखील त्यांनी यावेळी दिला होता. मात्र आता शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नाशिकच्या शिवसैनिकांचे डोळे विस्फारले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट नाशिक आणि दिंडोरीचे नगरसेवक आपल्या सोबत असल्याचे वक्तव्य केल्याने नेमकं कोण नगरसेवक असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. शिवाय शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी संजय राऊत हे स्वतः नाशिकमध्ये येऊन गेल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याने नाशिक पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या समाधीचे दर्शन
गुरुपौर्णिमेनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिंना वंदन केलं. नंतर त्यांनी ठाण्यात जाऊन आनंद दिघे यांच्या स्मृतिंना वंदन केलं. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच इतक्या मोठ्या पदापर्यंत सर्वसामान्य शिवसैनिक पोहोचू शकलेला आहे, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार आम्ही पुढे नेतोय असं सांगितलं. महाराष्ट्राचा विकास हेच युती सरकारचं ध्येय आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
पंढरपूरच्या वारकऱ्यांची भूमिकेला पसंती
दरम्यान एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, नव्या सरकारची तसेच शिंदे गटाची क्रेज महाराष्ट्र भर वाढत आहे. मागे पंढरपूर ला गेलो होतो, दहा लाख भाविक वारकरी भगिनी होत्या. त्या सर्वांनी मला आशीर्वाद घेतले. त्यावेळी येथील वारकऱ्यांनी खूप कौतुक केलं. त्या सर्वांचा आशीर्वादाचा मी स्वीकार केला. तसेच वारकरी भाविकांनी मी घेतलेल्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दिला.