Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात चंदन टोळी तस्कर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या (Maharashtra Police Academy) आवारात असलेले चंदनाच्या झाडाची (Sandalwood Tree) चार खोडे चोरट्याने बुंध्यापासून कापून नेल्याची घटना घडली आहे. 


नाशिक शहरात चंदन चोरीच्या अनेक घटना उजेडात आल्या आहेत. त्यानंतर मध्यतंरी या घटनांना आळा बसला होता, मात्र पुन्हा एकदा चंदन चोर सक्रिय झाले आहेत. शहरातील त्र्यंबक रोडवर महाराष्ट्र पोलीस अकादमीतुन चंदनाची चोरी करण्यात आली आहे. एवढ्या कडेकोट सुरक्षेतूनही चंदन चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  


नाशिक -त्र्यंबक रस्त्यावर महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी अकादमी आहे. या अकादमीच्या आवारात असलेल्या पश्चिम बाजूला विहिरीजवळ काही चंदनाची झाडे लावलेली आहेत. त्यापैकी सहा हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडांचा पाच ते सहा फूट लांबीचा मुख्य भाग, साडेचार हजार रुपये किमतीचा तीन ते चार फूट लांबीचा बुंधा, त्यानंतर साडेचार हजार रुपये किमतीच्या चंदनाचे झाडाचा तीन ते चार फुट लांबीचा मुख्य भाग तसेच दोन हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड बुंध्यापासून कापलेले व जमिनीवर पडलेले असे एकूण 17 हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडाची खोडे अज्ञात चोरट्याने 27 व 28 जुलैच्या मध्यरात्री चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात  नागनाथ दयानंद काळे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिसे करत आहेत.


इतकी सुरक्षा असूनही....
विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस अकादमी ही पोलीस उपनिरीक्षक यांना प्रशिक्षण देणारी संस्था आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेतून अनेक पोलीस उपनिरीक्षक बाहेर पडलेले आहेत. या ठिकाणी गेटवरच नागरिकांकडून ओळखपत्र अथवा तत्सम कागदपत्र तपासली जातात. अगदी काटेकोरपणे या नियमाचे पालन केले जाते. कोणत्याही ओळखी शिवाय नागरिकांना आत जाऊ दिले जात नाही. मात्र अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या आवारात जाऊन चंदनाची झाडे चोरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


शहरात यापूर्वीही चंदनाची चोरी 
फेब्रुवारी महिन्यात विशेष पोलिस महानिरीक्षक व कारागृह अधीक्षकांच्या बंगल्यासह कारागृहाची सुरक्षा भेदून चंदनाची झाडे चोरून नेण्यात आली होती. संशयित सराईत जावेदखान पठाण याला नाशिक शहर पोलिसांनी जेरबंद केले. दुसरी घटना पाथर्डी फाट्यावरील एका फार्महाऊसमध्ये घडली होती. येथून चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेला होता. तर तिसरी घटना शहरातील जेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्या शिंगाडा तलाव परिसरातील घराच्या आवारातील चंदनाचे झाड अज्ञात चोरटय़ाने कापून नेले होते. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.