Nashik News : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रत्येक आमदार कशात ना कशात तरी स्वतःला व्यस्त करून घेत आहेत. काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांचा शेतात काम करत असतानाच व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला होता. आता यात इगतपुरी त्र्यंबकच्या आमदार देखील सामील झाले आहेत. त्र्यंबक तालुक्यात पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले आमदार खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी कार्यकर्त्यांच्या शेतात भात आवणी केली आहे. याबाबत व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


इगतपुरी त्र्यंबकचे (Trimbakeshwer) आमदार हे मुंबईत कमी आणि मतदारसंघात अधिक असल्याचे दिसते. आमदार खोसकर यांचे गाव गिरणारे जवळील नागलवाडी. पहिल्यापासूनच शेतीमातीत राबलेले आमदार हिरामण खोसकर हे आताही शेतीकामात स्वतःला झोकून देतात. सध्या नाशिक (Nashik) जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार खोसकर या त्र्यंबक तालुका पिंजून काढला. 


दरम्यान नाशिक गुजरातच्या सीमेवर असलेल्या दावलेश्वर या ठिकाणी त्यांनी भेट दिली. यावेळी दमणगंगेला आलेला पुराचा त्यांनी आढावा घेतला. त्याचबरोबर जवळच सुरु असलेल्या भात आवणी त्यांनी पहिली. लागलीच त्यांनी कापड घेत शेतात उतरत भात आवणी केली. हा भात आवणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


दरवर्षी शेती करतात 
२०१९ साली आमदार हिरामण खोसकर हे काँग्रेसच्या तिकिटावर इगतपुरी त्र्यंबक मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर आमदार खोसकर हे आपल्या व्यस्त राजकीय कार्यक्रमांमधून वेळ काढत नेहमीच शेतीसाठी वेळ देतात. ते त्यांच्या नागलवाडी या गावी शेतात कामं करतात. आमदार खोसकर यांचं एकत्र कुटुंब असून ते दरवर्षी भात, नागली, टोमॅटो यासह विविध प्रकारची हरभरा, मसूर, भाजीपाला लागवड करतात. राजकारण आणि समाजकारणात व्यस्त असूनही ते गावापासून दूर गेलेले नाही. ते आजही शेतीतली कामे मोठ्या उत्साहाने करतात.


आमदार खोसकर यांचा पाहणी दौरा 
जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे त्र्यंबक तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क देखील तुटला आहे. तसेच शिरसगाव -मुरंबी येथील बांधकाम अवस्थेत असणारा पूल वाहून गेला. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार खोसकर यांनी पाहणी दौरा केल्याचे समजते.