Maharashtra Cabinet Expansion : कट्टर शिवसैनिक (Shivsanik) म्हणून ओळख जाणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे शिवसेनेचे नेते आहेत. आंक्रमक शैली हे गुलाबराव पाटील यांचे प्रमुख वैशिष्टय आहे. शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार होत आहे. जळगाव जिल्ह्यातून आलेले गुलाबराव पाटील यांचे कॅबिनेट मंत्रीपदाची (Cabinet Minister) शपथ घेतली आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखसलेल्या गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रीपदाची संधी दिली आहे. एक साधा पानटपरी चालक ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. 


गुलाबराव पाटील यांचा परिचय 
गुलाबराव पाटील यांचा जन्म 5 जून 1966 रोजी जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातील पाळधी गावी झाला. पाटील हे अंत्यत सर्वसाधारण घरातून आले आहेत. जळगाव जिल्ह्यात गुलाब भाऊ म्हणून ते प्रसिद्ध असून शिवसेना पक्षाच्या तिकिटावर जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. हे शिव सेना पक्षातर्फे एरंडोल मतदारसंघातून १०व्या आणि ११व्या तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून १३व्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात जलपुरवठा आणि निःसारणमंत्री होते. तत्पूर्वी ते २०१६-१९ दरम्यान देवेन्द्र फडणवीस मंत्रीमंडळात सहकारमंत्री होते. विशेष म्हणजे आपल्या आक्रमक शैलीमुळे ते खानदेशातील मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जातात. 


राजकारणात प्रवेश 
जळगाव जिल्ह्यातील पाळधी या छोट्याशा गावातुन गुलाबराव पाटील पुढे आले. पाळधी गावात ते नशीब नावाने पानटपरी चालवित असत. मात्र त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे ते शिवसेनेत आले. सुरवातीला त्यांनी अनेक आंदोलनात शिवसैनिक म्हणून सहभाग घेतला. गुलाबराव पाटील हे आपली रांगडी भाषेतून सभा गाजवायचे. त्यामुळे ते अल्पावधीत ते जनतेत लोकप्रिय झाले. आणि अशा पद्धतीने गुलाबराव पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाला. 


राजकीय कारकीर्द 
गुलाबराव पाटील यांची राजकीय कारकीर्द बघितली असता ते 1992 मध्ये एरंडोल पंचायत समितीवर निवडून आले. त्यानंतर त्यांची राजकीय गाडी सुसाट सुटली. 1995 ते 1999 या कालावधीत शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख पदाची धुरा सांभाळली. पुढे 1997 मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यानंतर प्रथमच शिवसेनेच्या माध्यमातून एरंडोल विधानसभा मतदार संघातून 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. दरम्यान 2014 म्हणून ते तिसऱ्यांदा जळगाव ग्रामीण मतदार संघातून विजयी झाले. त्यानंतर युतीच्या मंत्रीमंडळात सहकार राज्यमंत्रीपदावरपदी विराजमान झाले. त्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात ते राज्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा संधी मिळाली. आणि आता शिंदे सरकारमध्ये त्यांना तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतली आहे. 


राजकीय प्रवास सोपा नाही... 
गुलाबराव पाटील यांचा राजकीय संघर्ष अतिशय खडतर राहिला आहे. कट्टर शिवसैनिक होण्याआधी ते गावात पान टपरी चालवीत होते. कौटूंबिक कारणांमुळे त्यांनी तमाशातही काम केले आहे. त्यामुळे तते आजही तळागाळातील लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्राधान्य देतात. मंत्री असोत किंवा नसोत ते नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. त्यामुळे त्यांना शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते म्हणून ओळखले जाते.  


शिंदे गटातून खदखद बाहेर ... 
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत वेगळी वाट धरली. याशिवाय शिंदे यांच्यासोबत ४० आमदार देखील बाहेर पडले. शेवटच्या क्षणी कट्टर शिवसैनिक असलेले गुलाबराव पाटील यांनी देखील शिंदे यांना समर्थन दिले. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी शिवसेनसह उद्धव ठाकरेंवर आगपाखड केली. या दरम्यान त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेनेत अनेकदा अपमान सहन करावा लागल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी अनेकदा बोलून दाखविले आणि शिंदे गटासोबत गेले. आता शिंदे सरकारचा मंत्री मंडळ विस्तार झाला असून यामध्ये गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले आहे.