MLA Suhas Kande : राज्य सत्तांतर झाल्यानंतर आज बहुमताची चाचणी देखील भाजप शिंदे गटाने जिंकली आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या (Nashik) नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या मंत्रिपदासाठी कांदे समर्थकांकडून चक्क महापूजा करण्यात आली आहे. 


राज्यात भाजप शिंदे गटाने सरकार स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे यांच्या मंत्री मंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांच्याच नजर लागून आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य मंत्री मंडळाची यादी देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. दरम्यान या सर्वात नाशिक नांदगाव चे आमदार सुहास कांदे मात्र विशेष फेमस झाले आहेत. शिंदे गटात सामील होणारे ते पहिले शिवसैनिक होते. तेव्हापासून ते प्रकाश झोतात आले आहेत. 


सध्या भाजप शिंदे सरकारने विधानसभा अध्यक्ष आणि बहुमताची चाचणी दोन्ही परीक्षा पस केल्या आहेत. त्यामुळे आता शिंदे यांचे मंत्री मंडळ कस असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. नाशिकमध्ये सध्या भाजपचे पाच आणि शिंदे गटातील दोन आमदार आहेत. मात्र या सर्वात दोन तीन आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. यात आमदार सुहास कांदे हे देखील आघाडीवर आहेत. यासाठी तर नांदगाव येथील कांदे समर्थकांकडून थेट कांदेच्या मंत्रिपदासाठी पूजाच घालण्यात आली आहे. 


 कांदे समर्थकांकडून महापूजा
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेवून राज्याचा कारभार हाती घेतला आहे.. शिंदे मुख्यमंत्री झाल्याने नाशिकसह जिल्ह्यात तालुक्यात काही ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला आहे. आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची अतिषबाजी करित एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आमदार कांदे यांची  संभाव्य मंत्रिमंडळात समावेश व्हावा म्हणून तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील कांदे समर्थक तथा शिवसेनेतर्फे बेलेश्वर महादेव मंदिरात महापूजा व अभिषेक करण्यात आला.


सुहास कांदे यांचा जीवनप्रवास
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघाचे शिवसेना आमदार सुहास कांदे (Suhas Kande)  हे एकनाथ शिंदेच्या गटात आता सामील झाले. सुहास कांदे हे तसे नेहमीच चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील अनेक वाद हे सर्वश्रुत असून काही महिन्यांपूर्वीच भुजबळांविरोधात कांदे यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरेंकडे तक्रारही केली होती. आता आमदार सुहास कांदे हे शिंदे गटात असून त्यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.