Nashik Leopard Death : वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या (Leopard Death) मृत्यूच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. पाण्याच्या शोधार्थ निघाल्यानंतर रात्रीच्या सुमारास रस्ता ओलांडतांना घटना घडत आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) गोंदे दुमाला या गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू झाला आहे. 


इगतपुरी परिसरातील (Igatpuri ) मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे दुमाला जवळ हि घटना घडली. येथील एमआयडीसी समोरील नाशिकहुन मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने उडवले आहे. ह्या अपघातात बिबट्या जागीच ठार झाला असून बुधवारी रात्री ११ च्या सुमाराला ही घटना घडली. मुंबई आग्रा महामार्गावरील लिअर कंपनीच्या परिसरातून रस्ता ओलांडत असतांना बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्या ठार झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरु केला. दरम्यान महामार्गावर विविध कंपन्यांमध्ये रात्रीच्या वेळी कामावर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांमध्ये या घटनेने भीती पसरली आहे. अद्यापही परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता गृहीत धरून वन विभागाने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. 


या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वनपाल भाऊसाहेब राव, शैलेश झुटे, चालक मुज्यु शेख आदिंनी मृत बिबटयाचा घटनास्थळावर पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी मृत बिबट्याला निसर्ग परिचय केंद्रात नेण्यात आले. तर संबंधित अज्ञात वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 


अपघाताचे सत्र थांबणार कधी? 
मुंबई आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हे, घोटी, गोंदे दुमाला, मुंढेगाव आदी परिसरात बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे अनेकदा बिबटे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या धडकेत गतप्राण होण्याच्या घटना घडत आहेत. सातत्याने रस्ता ओलांडताना किंवा पाण्याच्या शोधार्थ भटकत असताना अपघात होणं, विहिरीत पडणे आदी घटना होतात. यासाठी वनविभागाने सदर बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात पाण्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. अनेकदा पाणी, खाण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी बिबटे वास्तव्य करतात. परिणामी हे दोन्ही गोष्टी उपलब्ध नसल्याने बिबटे शोधार्थ बाहेर पडतात. परिणामी अपघात होऊन मृत्यू ओढवतो.