Nashik Mockdrill : नाशिक शहरातील पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या पंचवटी परिसरातील सीता गुंफाजवळ दहशतवाद्यांनी घुसून नागरिकांना बंधक बनविल्याचे समजताच नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयातील क्यू आर टी, दहशतवादी विरोधी पथक व बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांना पकडण्यात आले असून त्यातून नागरिकांची सुटका करण्यात आली. 


थांबा थांबा, हे होत नाशिक पोलिसांनी केलेले मॉकड्रील. शहराच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने मॉकड्रील घेण्यात आली. पंचवटी परिसरातील सीता गुंफा जवळ हा सराव घेण्यात आला होता. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात क्यू आर टी पथक दहशतवादी विरोधी पथक व बॉम्बशोधक व नाशक पथकाने या मॉक ड्रिलमध्ये सहभाग घेतला होता.


नाशिकमधील सीता गुंफा येथे दशतवाद्यानी नागरिकांना बंधक बनविले असल्याचा फोन नाशिक आयुक्तालयात येतो. त्यानुसार पोलीस पथकासह पोलीस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची वाहने मोठ्या वेगात येतात आणि सीता गुफा येथे सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार करतात. हे पोलिसांचे मॉक ड्रील असले तरी एकाचवेळी पोलिसांची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झाल्याने मोठी घटना घडल्याची चर्चा अन् अफवा होते; मात्र पोलिसांकडून काही क्षणातच हे मॉक ड्रील असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक जण सुटकेचा निश्वास टाकतात. 


सीता गुफा परिसरात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस सीता गुफा परिसराला घेराव घालतात आणि पोलिसांचे पथक गुफा परिसरात असणाऱ्या दहशतवाद्यांना ठार करते. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस दलाने गुरुवारी दुपारच्या सुमारास पंचवटीत पर्यटकांचं श्रद्धास्थान असलेल्या सीता गुफा  परिसरात दहशतवाद्यांचा खात्मा कशा प्रकारे केल्या जातो, यासंदर्भात मॉक ड्रील केले. सीता गुंफेत दहशतवादी घुसले असून, त्यांनी संपूर्ण सीता गुफा परिसर हॉयजॅक केल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. नियंत्रण कक्षाकडून स्थानिक पोलीस स्टेशन, अग्निशमन दल, अ‍ॅम्बुलन्स, शिघ्रकृतीदल, बॉम्बशोधक व नाशक पथकास ही माहिती देण्यात आली. काही वेळात पोलीस अधिकाऱ्यांसह विशेष पथकाचे प्रमुख व इतर यंत्रणा त्वरित सीता गुंफेजवळ दाखल झाली.


दहशतवादी असलेल्या सीता गुंफेचा परिसर पोलिसांनी दोरी लावून निर्मनुष्य केला. संपूर्ण घटना पाहताना परिसरातील समस्त नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला, त्यातच पोलिसांनी एक एक करून दहशतवाद्यांना ठार केले. हा सर्व प्रकार सुरू असताना काही नागरिक जमिनीवर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे इतर नागरिकांना काहीच कळेनासे झाले; मात्र पोलिसांनी मॉक ड्रिल पूर्ण झाल्यानंतर मॉकड्रिल असल्याचे जाहीर केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.