Jalgaon News : गेल्या काही वर्षांपासून लग्नासाठी (Marraige) मुलगी मिळणे मुश्किल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच गावाकडं शेती करत असलेल्या तरूणांना तर वधू मिळणे अवघड झाले आहे. मुलींना मुलाकडे शेती हवी असली तरी त्या स्वत: शेतात जाण्यासाठी तयार नसल्याचे आजचे चित्र आहे. याच विरोधाभासावर जळगावमधील (Jalgaon) तरुण शेतकऱ्याने अनोखे आंदोलन केले आहे. 


'आपण मेहनती व सधन बागाईतदार असून आपल्याला बागायतदारीणच म्हणजे शेतात काम करणारी बायको हवी!' असे जाहीर करून त्याने एकीकडे धमाल उडवून देतांना दुसरीकडे समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. पाचोरा (Pachora) तालुक्यातील नाचणखेड्याच्या पंकज राजेंद्र महाले (Pankaj Mahale) या तरूणाने आपल्या अनोख्या आंदोलनातून उत्तर दिले आहे. दहा एकर बागायती जमिनीचा मालक व उच्च शिक्षण असतानाही केवळ शेतकरी असल्याने लग्नासाठी मुलगी मिळत नाही. यामुळे हताश झालेल्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील एका तरुणाने डोक्यास मुंडावळ्या बांधून बागायतदार आहे, बागायतदारीण 'पाहिजे' असा फलक हातात घेत अनोखे आंदोलन करीत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. पंकज राजेंद्र महाले असे आंदोलन करणाऱ्या अविवाहित उच्चशिक्षित बागायतदार तरुणाचे नाव आहे.


दरम्यान सध्या लग्नाचा सीजन सुरु असून अशातच राज्यात अनेक तरुण लग्न करण्यास इच्छुक असताना मुलगी मिळणे अवघड होऊन बसले आहे. अनेक मुलींचे वडील शेतकरी नवरा नको म्हणून टाळाटाळ करत असल्याचे देखील समोर आले आहे. पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा या गावातील पंकज महाले या तरुणाने बीएस्सी अॅग्रीकल्चरचे उच्च शिक्षण घेतले आहे. त्याची गावात दहा एकर बागायत अर्थात पाण्याची मुबलकता असलेली जमीन आहे. सध्या नोकरी नसल्याने तो बेरोजगार असून, घरच्या शेतीची मशागत करतो. मात्र, बागायती शेती असतानादेखील केवळ नोकरी नाही, म्हणून त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने त्याचे वधू संशोधन सुरू आहे. विवाहयोग्य मुलगी मिळत नसल्याने पंकज हताश झाला आहे. हीच समस्या अनेक तरुण शेतकऱ्यांचीदेखील आहे. शेतकरी आहे, ग्रामीण भागात राहत असल्याने मुली मिळत नाही.


कृषिप्रधान देश असूनही समस्या


दरम्यान भारत हा शेती प्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र दुसरीकडे शेतकरी तरुणांना मात्र सद्यस्थितीत लग्नासाठी वधू मिळेनाशी झाली आहे. याच माध्यमातून अनेकदा विवाहच्छुक तरुणांनी आंदोलन देखील केली आहे. याच पार्श्वभूमीवर या सामाजिक समस्यकडे लक्ष वेधण्यासाठी पंकज महाले याने डोक्यावर टोपी, पांढरे कपडे परिधान करून डोक्याला मुंडावळ्यादेखील बांधल्या. या आंदोलनाचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे या आंदोलनाची संपूर्ण राज्यात चर्चा रंगली. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. मग शेतकऱ्यास मुलगी का दिली जात नाही. शेतकरी मुलांना तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना मुलगी दिलीच पाहिजे, अशा भावना यावेळी पंकज महाले याने व्यक्त केल्या.