Nashik NMC Elections : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body elctions) निवडणुकांचे बिगुल वाजले असून आता इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता आगामी महापालिका निवडणुकांसाठी (Nashik NMC Elections) अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींच्या (एसटी) प्रभागांचे आरक्षण महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. 


एकीकडे निवडणूका घेण्यासाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर निवडणूक आयोग, प्रशासन, इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते सर्वच जोमाने कामाला लागले आहेत. तर ओबीसी आरक्षणामुळे काही अंशी निवडणुकांवर टांगती तलवार आहे. असे असताना आता नाशिक मनपाच्या निवडणूक विभागाकडून अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींच्या (एसटी) प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने एकूण 133 जागांपैकी तब्बल 29 जागा अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी राखीव ठेवल्या आहेत. त्यापैकी 19 अनुसूचित जाती तर 10 अनुसूचित जमाती साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत महिलासांठीचे आरक्षण जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.


दरम्यान नाशिक महापालिकेची निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) होणार आहे. त्यानुसार 44 प्रभागातून 133 नगरसेवक महापालिकेत जाणार आहेत. शहरातील एकूण 44 प्रभागांपैकी 43 प्रभाग त्रिसदस्यीय पद्धतीचे तर एक प्रभाग चार नगरसेवकांचा असेल. निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून नुकतीच जाहीर करण्यात आल्यानंतर प्रभागांचे नकाशे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पुढील टप्प्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यानुसार अनुसूचित जातींसाठी 19, तर अनुसूचित जमातींसाठी 10 प्रभाग आरक्षित झाले आहेत.



सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेशमध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला परवानगी दिली असली तरी अद्याप महाराष्ट्रात हा प्रश्न न्यायालयीन आहे. त्यामुळे आगामी निवडणूक देखील ओबीसी आरक्षणाशिवाय घ्या, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सध्या तरी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होत असल्याने इतर निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या अनुषंगाने अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. संबंधित प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत असलेल्या अनुसुचित जाती आणि जमाती प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार आरक्षण निश्चित करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून देण्यात आली. 


आकड्यांचं गणित
2017 च्या नाशिक मनपा निवडणुकांमध्ये, 122 जागांपैकी 27 जागा SC/ST उमेदवारांसाठी राखीव होत्या, तर 33 जागा ओबीसी उमेदवारांसाठी होत्या. उर्वरित 62 जागा सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. 2022 च्या नागरी निवडणुकांसाठी एकूण जागांची संख्या 122 वरून 133 पर्यंत वाढली आहे. तसेच, ओबीसींसाठी कोणतीही जागा राखीव नसल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील जागा 104 असतील. गेल्या निवडणुकीत एकूण 122 जागांपैकी 61 महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या, ज्यात सर्वसाधारण प्रवर्गातील 30, अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी पाच आणि ओबीसींसाठी 17 जागा होत्या. आगामी मनपा निवडणुकांसाठी, एकूण 133 जागांपैकी 67 महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 52 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 10 अनुसूचित जातींसाठी आणि 5 अनुसूचित जमातींच्या जागांसाठी आहेत.