Nashik News : मागील दोंन दिवसात नाशिक (Nashik) शहरात प्रेम प्रकरणातून हत्या, आत्महत्यांच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता लग्नास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नाशिकच्या देवळाली कॅम्प (Deolali Camp) परिसरात हि घटना घडली असून अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देत तिच्यासोबत शारीरिक संबध ठेवल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी संशयितास लग्नाबाबत विचारले असता संशयिताने नकार दिल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या अल्पवयीन प्रेयसीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी संशयित प्रियकराच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. आदित्य उत्तम भालेराव असे या संशयित प्रियकराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी यांच्या १६ वर्षीय मुलीचे आणि संशयिताचे प्रेमसंबंध होते. मुलगी अल्पवयीन असूनदेखील संशयित तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यासाेबत शारीरिक संबंध ठेवत होता. १ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता घराच्या शेजारी बंद खोलीत संशयित तरुण आणि पीडित मुलगी यांना नकाे त्या अवस्थेत पाहिले.
दरम्यान याबाबत मुलीच्या आई वडिलांनी मुलीला विचारणा केली असता मुलीने ‘आम्ही दोघे लग्न करणार आहे’ असे सांगितले. याबाबत मुलीच्या वडिलांनी संशयित तरुणाला विचारले असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. वडिलांनी ही बाब मुलीला सांगितल्यानंतर तिला धक्काच बसला. याच धक्क्यातून तिने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी आत्महत्या केली. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमप्रकरणाची तिसरी घटना
नाशिक शहरात गेला दोन दिवसांपासून प्रेमप्रकरणाच्या घटना घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये काल एका प्रियकराने प्रेमभंग झाल्याने सरकारवाडा पोलिसांत जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे वेळीच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आणल्याने त्याचा जीव वाचला. तर दुसरी घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून पतीने प्रियकर तरुणाला गाठत धारदार शस्राने गळा चिरल्याची घटना रविवारी घडली.