Nashik Ganeshotsav : यंदाच्या गणेश उत्सव आगामी गणेशोत्सवात नाशिक शहर (Nashik) पीओपी पासून तयार केलेल्या गणेशमूर्तींवर बंदी (Ganesh Murti) घालण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय प्रशासक तथा आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी निर्णय घेतला आहे. दरम्यान या निर्णयामुळे जिल्ह्यातील मुर्तीकारांचे धाबे दणाणले आहे. शासनाच्या या निर्णयावर विचार करण्याची गरज असल्याचे मत मूर्तिकार संघटनेने व्यक्त केले आहे.
दरवर्षी गणेशोत्सवात 'पीओपी'च्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यानंतर होणाऱ्या प्रदूषणाचा विचार करून, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या मूर्तींच्या वापरावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहे. याबाबत महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी नुकतीच बैठक घेतली. यामध्ये यंदाच्या गणेशोत्सवात महापालिका क्षेत्रात 'पीओपी' गणेश मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना नाशिक शहरात सध्या 750 च्या आसपास कारखाने असून आतापर्यंत बारा लाख पीओपी गणेश मुर्त्या तयार झाल्या आहेत. मात्र आता या मूर्तींचे करायचे काय, असा सवाल गणेश मूर्ती कारागिरांनी उपस्थित केला आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार करण्यात आलेल्या मूर्तींचे नदी पात्रात विसर्जन करता येणार नसल्याचा निकाल दिल्याने त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने चालू वर्षांपासून पीओपी मूर्ती उत्पादन, विक्री व साठ्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा नाशिकमध्ये पीओपी पासून तयार केलेल्या गणपती मूर्तीवर निर्बंध असणार आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिकमधील मूर्तिकार संघटना आक्रमक झाल्या असून या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या संख्येने लहान-मोठे मूर्तिकार असून त्यांच्या उपजीविकेचे ते एकमेव साधन आहे. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांकडे गणपतीच्या मूर्त्यांचा माल तयार झाला आहे. तर काही मूर्तिकारांकडे 01 ते 15 जून दरम्यान मूर्त्यांचे व्यापारी बुकिंगही केले जाणार आहे. यावर्षीच्या मूर्ती निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने शासनाने पीओपी मूर्ती बंदी बाबतच्या निर्णयाचा फेरविचार करावा व शेकडो मूर्तिकारांचे भविष्य वाचवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
रोजगारावर परिणाम
जिल्ह्यात पीओपीच्या मुर्त्या बनविणारे हजारो कारागीर आहेत. त्यांच्या पिढ्यान पिढ्या गणेश मूर्ती बनविणाऱ्या कार्यशाळा देखील आहेत. यातुन अनेकांचा उदर्निवाह चालतो. मात्र मनपाच्या या निर्णयानंतर कारागिरांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. एकीकडे दरवर्षी पीओपीच्या मूर्ती विसर्जन करताना अनेक पर्यावरण प्रेमी आपल्या संस्थेच्या माध्यमातून मूर्ती संकलन करत होते. त्यातून प्रदूषणाला काही अंशी आळा बसत होता. आणि मूर्तीकरांना रोजगारही मिळत होता. मात्र यंदा पीओपी मुर्त्यांवर बंदी आणल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये जरी समाधान असले तरी कारागिरांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील मोठा पारंपरिक उत्सव असून तो उत्साहात साजरा केला जातो. यासाठी लागणार्या प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनवण्याच्या व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे पीओपीच्या मूर्तींवर सरसकट बंदी घालू नये, त्यासाठी पीओपी आणि त्यामधील घातक रसायनांना पर्याय द्यावा व पीओपी बंदी बाबतचा निर्णय दिवाळीनंतर लगेच जाहीर करावा म्हणजे मूर्तिकारांचे आर्थिक नुकसान होणार नाही.
- संजय सोनार, अध्यक्ष, नाशिक जिल्हा मूर्तिकार संघटना