Shravani Somwar : नाशिकच्या (Nashik) एसटी महामंडळाला (ST Mahamandal) तिसरा श्रावणी सोमवार (Shravani Somwar) चांगलाच पावला असून एका दिवशी एसटी मंडळाला तब्बल 58 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत राहिलेली उणीव एसटीने एका दिवसांत काही अंशी भरून काढल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 


मागील दोन वर्ष कोरोना (Corona Crisis) काळात गेल्याने त्र्यंबकेश्वरसह (Trimbakeshwer) इतर धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळे बंद होती. त्यामुळे श्रावण सोमवार देखील भाविकांनी पाठ फिरवली होती. अखेर दोन वर्षानंतर निर्बंध शिथिल झाल्याने यंदाच्या श्रावण सोमवारला एसटी ला चांगलेच उत्पन्न मिळाले आहे. तिसऱ्या सोमवारसाठी सोडण्यात आलेल्या जादा बसेसमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला घसघशीत 58 लाख 51 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने खऱ्या अर्थाने एसटी सुखावली आहे. 


बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला लाखो भाविक भेट देत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंदा श्रावणी सोमवार सह ब्रम्हगीरी फेरी देखील सुरु झाली. ब्रम्हगिरी फेरीसाठी अडीच ते तीन लाख भाविक फेरीसाठी येण्याची शक्यता गृहीत धरून एसटी महामंडळाने तब्बल 375 जादा बसचे नियोजन केले होते.. रविवारी दुपारपासून शहरातील मेळा बसस्थानकासह जिल्ह्यातील विविध स्थानकांतून बस सोडण्यात आल्या. त्यामुळे तर खंबाळे पार्किंग परिसरात मोठी ट्रॅफिकही पाहायला मिळत होती. 


या पार्श्वभूमीवर मेळा बसस्थानकातून 175, निमाणी येथून 50, महामार्ग बसस्थानकातून 20, नाशिकरोडमधून 50, सिडको येथून 05, इगतपुरीतून 05, घोटी येथून 10, खंबाळे येथून 40, तर तळवाडे येथून 05 जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे तब्बल अडीच ते तीन लाखाहून अधिक भाविकांनी बससेवेचा लाभ घेतला. शिवाय त्र्यंबक परिसरातील खंबाळे, अंबोली, तळवाडे आदी परिसरात वाहनतळ उलब्ध करण्यात आले होते. या ठिकाणाहून भाविक त्र्यंबकेश्वरला बसने जात होते. यावेळी नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गावर एकूण 230 बसेस धावल्या, सुमारे 4180 फेऱ्या, 162121 प्रवाशांनी प्रवास केला. आणि तब्बल 58 लाख 51 हजार 223 रुपये उत्त्पन्न मिळाले.


एसटीला भाविकांचा प्रतिसाद 
नाशिक शहरात सध्या सिटीलिंकच्या माध्यमातून बससेवा सुरु आहे. तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यात डबघाईला आलेली एसटी बससेवा आजही तग धरून आहे. शिवाय नाशिक शहर परिसर असो कि ग्रामीण भाग आजही एसटी बससेवेच्या माध्यमातून सेवा पुरवण्याचे काम निरंतर सुरु आहे. त्यातच तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविक एसटी बस ला भरघोस प्रतिसाद दिला आहे.