Nashik Budget : नाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक ( Nashik Municipal Corporation ) आज सादर झाले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी 2400.75 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. अंदाजपत्रकात नाशिककरांना दिलासा देणारी बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची मालमत्ता किंवा पाणीपट्टी करात वाढ झालेली नाही. नाशिक मनपा आयुक्तांनी 2400.75 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून 1.81 कोटी शिल्लकीचे अंदाजपत्रक आहे.
नाशिक महापालिकेचा आज 2023-24 चा अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यात अनेक गोष्टीना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये नाशिक शहरातीत वाढत्या पार्किंग समस्येचा प्रश्न लक्षात घेता, शहरातील यशवंत मंडई या ठिकाणी पार्किंग होणार असून, शहरात मल्टीलेवल पार्किंग देखील प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ई-व्हेईकल्सला चालना मिळणार असून, शहरातील 106 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, तातडीने 20 ठिकाणी केंद्र सरकारच्या एन- कॅप या योजनेतून चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 'नमामि गोदा' प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. गोदावरीचे प्रदूषण थांबवणे आणि सौंदर्यीकरण करणे, यासाठी 'नमामि गोदा' हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करून निधीची मागणी केली जाणार आहे.
नाशिकमधील फाळके स्मारक या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी देखील प्रयत्न केले जाणार असल्याची घोषणा आयुक्तांनी केली आहे. नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियमची उभारणी सुरू असून, या क्रिकेट स्टेडियमच्या दुसऱ्या टप्प्यातील काम येत्या अर्थसंकल्पात होणार आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाच्या दुसऱ्या टप्प्यातील देखील काम होणार असून त्यासाठी दहा कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी नाशिक महापालिकेने नववर्ष स्वागत संकल्पना तयार करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे. अर्थसंकल्पात प्रभाग निधी आणि नगरसेवक स्वेच्छा निधीची देखील तरतूद करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.
>> असा आहे यंदाचा पालिकेचा अर्थसंकल्प
- आयटी पार्क प्रस्तावित, 69 शाळा स्मार्ट होणार.
- मालमत्ता आणि पाणीपट्टी करात कोणतीही वाढ नाही. 25 टक्के पेक्षा प्रॉपर्टी टॅक्स पुढील वर्षी वसूल होईल
- यशवंत मंडई येथे पार्किंग होईल. मल्टी लेव्हल पार्किंग प्रस्तावित करण्यात आले आहे.
- फाळके स्मारक साठी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न होईल.
- सिंहस्थ कुंभमेळा साठी पूर्वतयारी सुरू.
- आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम दुसऱ्या टप्प्यातील काम होईल.