Nashik News : पावसाळा (Rainy Season) म्हटलं की घराच्या आजूबाजूला सापांचा वावर (Snake) पाहायला मिळतो, कधी कधी घरातही साप आढळून येतात. अशावेळी घरातल्या लोकांची चांगलीच धांदल उडते. असाच काहीसा प्रकार नाशिक (Nashik) शहरात घडला आहे. सिडको परिसरात एका घरात कोब्रा जातीच्या सापाची पाच पिल्लं आढळून आली आहेत.


सापाला पाहून भल्याभल्यांची भंबेरी उडते. अशावेळी एखाद्याच्या घरातच पाच कोब्रा साप (Cobra Snake) आढळल्यास त्याची काय अवस्था होईल, याची कल्पना करा. नाशिक शहरातील सिडको परिसरातील डीजेपी नगर दोनमधील केवल पार्क परिसरात एका रो हाऊसमध्ये कोब्रा जातीच्या विषारी नागांची पाच पिल्लं आढळून आली. कुटुंबीयांनी तात्काळ सर्पमित्राला ही बाब सांगून सर्पमित्राने ती पिल्ले बरणीत बंदिस्त करत नैसर्गिक अधिवासात सोडली आहे.


सर्पमित्र तुषार गोसावी यांच्याशी संपर्क साधून कोब्रा सापाची पिल्ले आढळल्याची माहिती दिली. गोसावी यांनी तात्काळ रो हाऊस गाठत पाहणी केली असता एका चेंबरच्या डकमध्ये त्यांना नागाची मादी सरपटताना नजरेस पडली. तिला पकडण्याचा प्रयत्नाच्या अगोदरच घुशीच्या बिळात तिने प्रवेश केला. नंतर स्वच्छतागृहाच्या जाळीच्या मार्गातून काही पिल्ले थेटर हाऊसमध्ये शिरल्याने तीन पिल्ले स्वयंपाक गृहात आढळून आली. तर दोन पिल्ले बेडरूम मधून गोसावी यांनी कौशल्याने ताब्यात घेतली. यानंतर वन विभागाला याबाबत कळवण्यात आले. पाचही पिलांना गोसावी यांनी ताब्यात घेत नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. काही दिवसांपूर्वी याच भागातील कामटवाडे परिसरात एका अपार्टमेंटच्या वाहनतळात घोणस जातीच्या सर्पाची 24 पिल्ले आढळून आल्याने भीतीचं वातावरण पसरलं होतं.


पावसाळ्यात काळजी घ्या 


पावसाळ्यात दिवसात नागरिकांनी काळजी घेणं महत्वाचा असून घरातील किंवा इमारतीमधील डक किंवा अडगळीची जागा नेहमीच स्वच्छ ठेवायला हवी. पार्किंगची जागा तसेच घराच्या टेरेसवर असलेल्या टाकाऊ वस्तूंच्या पसाऱ्यातसुद्धा साप आश्रय घेऊ शकतात. यामुळे या जागा स्वच्छ ठेवण्यात याव्यात. साप दिसल्यास तात्काळ वनविभागाला किंवा सर्पमित्राशी संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले. तसेच कोब्रा अर्थात नाग हा एकमेव सर्प असा आहे, जो फणा काढून उभा राहतो. हा विषारी सर्प असून मनुष्यप्राण्यासाठी त्याचा दंश धोकादायक ठरू शकतो. त्याचा दंश झाल्यानंतर त्या जागेभोवती बधिरपणा जाणवतो व सूज येते. तोंडावाटे लाळ गळू लागते. श्वासोच्छवासास अडथळे जाणवतात आणि उलट्याही होऊ शकतात, अशावेळी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे ठरते. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Amravati News : अबब! एकाच घरातून निघाले तब्बल 10 अजगर, उत्तमसरा येथील घटना