Nashik HSC Exam : काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या (Nashik) दहावीच्या विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीची घटना घडली होती. हे विद्यार्थी परीक्षेसाठी गेले असताना गाडीच्या डिक्कीतून मोबाईल लंपास करण्यात आले होते. आता पुन्हा बारावीचा पेपर देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गाडीच्या डिक्कीतून मोबाईल पळवल्याची घटना घडली आहे. एकूण सहा मोबाईल चोरीला गेले असून इतर विद्यार्थ्यांचे देखील मोबाईल पळवल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र्र शिक्षण बोर्डाकडून दहावी बारावीची परीक्षा (HSC Exam) सुरू आहे. नाशिक शहरातही विविध शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थी परीक्षेसाठी हजेरी लावत असून परीक्षा देत आहेत. अशावेळी परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी हे विद्यार्थी बॅग शाळा महाविद्यालयाच्या पोर्चमध्ये अथवा सोबत आणलेल्या गाडीच्या डिक्कीत ठेवत आहेत. मात्र याचा फायदा चोरटे घेत असून डिक्कीतून मोबाईल लांबवण्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागातील महाविद्यालयात शुक्रवारी बारावीच्या परीक्षेचे पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये दुचाकी उभ्या केल्या. बहुतांश दुचाकींच्या डिक्कीमध्ये मोबाइल ठेवले. पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन मोबाइल तपासले असता डिक्कीत ठेवलेले मोबाइल गायब झाल्याचे लक्षात आले.
दरम्यान, एक-दोन नव्हे तर आठ ते दहा अॅक्टिव्हा दुचाकींच्या डिक्कींमधील सुमारे दहा ते बारा मोबाइलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहावी बारावीच्या परीक्षा केंद्रावर संबंधित शाळा महाविद्यालयांनी सुरक्षारक्षक नेमलेले असून देखील पार्किंगमध्ये चोरट्यांचा वावर कसा? असा प्रश्न पालक विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. सुरक्षारक्षकांकडून केवळ विद्यार्थी, पालकांना विविध सूचना करत धारेवर धरले जाते. मात्र सर्रासपणे पार्किंगमध्ये दुचाकींच्या डिक्की उघडून एक-दोन नव्हे तर तब्बल दहा ते बारा मोबाइल चोरट्यांकडून लांबविण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी परीक्षार्थी फिर्यादी शुभम आव्हाड याने दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध व्ही. एन. नाइक कॉलेजच्या आवारातून सहा महागडे मोबाइल चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार न दिल्यामुळे त्यांच्या मोबाइल चोरीची नोंद कागदोपत्री होऊ शकलेली नाही. सहा मोबाइलमध्ये अॅपलचे दोन आयफोन, रियलमी, ओप्पो, एअरपॉड अशा कंपन्यांचे एकूण 94 हजार रुपये किमतीचे मोबाइल गायब केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. परीक्षेच्या कालावधीत अशा प्रकारे महाविद्यालयाच्या आवारातील दुचाकींच्या डिक्कीमधून चोरांनी मोबाइल गायब केल्याने विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. महाविद्यालयांनी अज्ञात आणि अनोळखी तरुणांना आवारात प्रवेश देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.