Nashik Unseasonal Rain : जुनी पेन्शन (Old Pension) योजनेच्या मुद्यावरून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप (staff Strike) मिटला आणि कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला सुरुवात झाली. पंचनामे सुरू झाले असले तरी हजारो शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील (Chandwad) शेतकऱ्याची अवकाळी पावसामुळे टरबूज शेती उध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 


आपल्या मागण्यांसाठी संप पुकारून आठ दिवस सरकार, सर्वसामान्य जनततेला सरकारी कर्मचाऱ्यांनी वेठीस धरले होते. यात आधीच अवकाळीचा मार सहन केलेला बळीराजादेखील भरडला गेला. लहरी निसर्गाशी दोन हात करून कांदा द्राक्ष, गहू, हरभरा, फळं, भाजीपाला पिकवला. मात्र, शेतीमाल ऐन बाजारपेठेत येण्याच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपीट आल्यानं शेतकऱ्यांचे पीक उध्वस्त झाले. होत्याचे नव्हते झाले. मायबाप सरकारकडे शेतकरी डोळे लावून बसला. मात्र शेतकऱ्यांच्या वर्तमानापेक्षा कर्मचारी ना त्यांच्या भविष्याची चिंता अधिक महत्वाची वाटली. त्यांनी संपाचे हत्यार उपसले आणि पंचनामे रखडले. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यात 600 गावातील हजारो शेतकऱ्यांचे आठ एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. चांदवड तालुक्यातील पन्हाळे गावात चार दिवसांपूर्वी अर्धातास गारपीट झाली. यात सोमनाथ आवारे यांची टरबूज शेती उध्वस्त झाली. टरबूजाना गारांचा मार लागल्यानं वेल खराब झालीच, मात्र आत टरबूज गुर ढोरे ही खाण्याच्या अवस्थेत नसल्याने फेकून देण्याची वेळ आली असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. जी परिस्थिती टरबूजाची त्याहूनही भयंकर अवस्था कांदा पिकाची आहे. पुढच्या वर्षी कांद्याचे चांगले उत्पन्न घेता यावे, यासाठी घरचे बियाणे तयार केले. मात्र बियाणे तयार होण्याच्या स्थितीत आलेल्या डोंगळ्या ना गारपिटीचा मार लागला आणि त्यांनी मानच टाकून दिली. त्यामुळे हा हंगाम तर गेलाच पण पुढंचाही हंगाम गेला आहे. 


अशीच परिस्थिती सर्वत्र बघायला मिळत आहे, सूर्यभान वाघ एकत्र कुटुंब पद्धतीत वाढले. ते शेतीही एकत्र कसतात, त्यामुळे 20 ते 25 एकर क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड केली लाखो रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. पुढील एक महिन्यात कांदा बाजारठेत  येणार होता, काही कांद्याची चाळीत साठवण ही करता आली असती. मात्र आता हाच कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. खरिपात ही अतिवृष्टीमुळे नुकसान झले होते, पीक विमा काढला मात्र अद्यापही।मदत मिळाली नसल्याने भविष्यात तरी काय मिळणार असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे. संपातही काही कर्मचारी पंचनामे करण्याचे काम करत होते. मात्र,  आता दोन दिवसात संपूर्ण पंचनामे पूर्ण करून नवीन निकष प्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असा विश्वास अधिकारी व्यक्त करत आहेत. 


कृषीमंत्री अब्दुल सत्तार नाशिक दौऱ्यावर


कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून ते आज नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. आज दुपारी चार वाजेच्या दरम्यान चांदवड, निफाड तालुक्यातील काही गावांना भेट देणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहेत..