Nashik Crime : पुणे शहरानंतर नाशिकमध्ये (Nashik) कोयता गँगची दहशत असून दिवसाआड कोयता गँगच्या (Koyata Gang) घटना घडत आहेत. यात अल्पवयीन मुलांपासून ते सराईत गुन्हेगारांपर्यत सर्रास प्राणघातक हल्ले केले जात आहेत. अशातच कोयता गँगने चक्क शाळेतल्या मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना नाशिक (Nashik) शहरात उघडकीस आली आहे.
नाशिक शहरात ज्यापद्धतीने गुन्हेगारी (Crime) घडत आहे, त्यावरून शहरात पोलिसांचा (Nashik Police) धाकच उरला नसल्याचे चित्र आहे. राजरोसपणे हल्ला, मारहाण, गोळीबार, खून अशा घटना घडत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक भीतीच्या सावटाखाली आहे. दोन दिवसांपूर्वी अंबड परिसरात (Ambad) कोयता घेऊन दहशत पसरवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एका शाळकरी मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दहावीचा पेपर सुटल्यानंतर मित्रांसोबत घरी जात असताना एका दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर आठ ते दहा जणांकडून कोयत्याने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
सध्या दहावीचे पेपर (SSC Exam) सुरु असून अवघे एक दोन पेपर शिल्लक आहेत. आजही अनेक केंद्रावर दहावीचा पेपर होता. दुपारी दोन वाजता हा पेपर सुटल्यानंतर संबंधित विद्यार्थी मित्रांसोबत घरी जात असताना ही घटना घडली. अचानक काही तरुणांनी विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार करत पळ काढल्याचे विद्यार्थ्यांसह पालकांनी सांगितले. या घटनेत संबंधित विद्यार्थ्यास किरकोळ दुखापत झाली असून उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेने पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण असून अशाप्रकारे सराईत गुन्हेगारांबरोबरच आता अल्पवयीन मुले देखील हल्ला, मारहाण या घटनांमध्ये सभागी होत असल्याचे दिसून येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार शहरातील दिंडोरी रोडवरील विद्यालयात ही घटना घडली आहे. येथील दहावीचा विद्यार्थी हा दहावीचा पेपर सुरु असल्याने शाळेत गेला होता. पेपर सुटल्यावर त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये तो किरकोळ जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी संशयित आणि संबंधित विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता. याचा राग मनात धरून संशयित मुलांनी इतर काही मुलाना बोलवून विद्यार्थ्यांवर हल्ला चढवल्याचे जखमी विद्यार्थ्याने सांगितले. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळकरी मुलावर देखील आता कोयत्यांना हल्ला होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचं प्रमाण वाढतंय
दरम्यान शहरात गुन्हेगारी फोफावत असताना आता अल्पवयीन मुलांमध्ये देखील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र आहे. नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने याचा प्रभाव थेट शाळकरी मुलांवरही होताना दिसून येत आहे. किरकोळ कारणातून शाळकरी मुले देखील भान विसरून अनुचित प्रकार घडवत आहेत. त्यामुळे पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या अगोदर बऱ्याचदा शहरात महाविद्यालयीन तरुणांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळाला आहे परंतु आता शाळेतील विद्यार्थी देखील अशा पद्धतीने मारामाऱ्या करत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.