Nashik Crime : खरं तर धार्मिक शहर, पौराणिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिक (Nashik) शहराचे सामाजिक स्वास्थ सध्या बिघडले असल्याचे चित्र आहे. शहरात दिवसाढवळ्या सर्रास प्राणघातक हल्ले, मारहाण करण्याच्या घटना होत आहेत. बंदूक, चॉपर, तलवारी, कोयता याचा सर्रास वापर सुरू असल्याने सामान्य नागरिकांना परिसरात वावर करणे कठीण झाले आहे. 


नाशिक (Nashik) शहरात सध्या गुन्हेगारीने (Crime) चांगलंच डोकं वर काढलंय. कोयत्याने प्राणघातक हल्ले (Attack), गोळीबाराच्या घटना सर्रासपणे समोर येत असून पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकच राहिला नसल्याचं बघायला मिळत आहे. नाशिक शहरात सध्या पोलीस आहेत की नाही? असाच प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण शहरात मोकाटपणे टोळके शस्त्र घेऊन फिरत आहेत. कोयत्याने हल्ले चढवले जात आहेत. एवढंच नाही तर गोळीबाराच्याही घटना आता सर्रासपणे समोर येऊ लागल्या आहेत. कार्बन नाका परिसरात रविवारी एका तरुणावर गोळीबार (Gun fire) तसेच कोयत्याने वार करण्यात येऊन सिनेस्टाईल पद्धतीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली होती. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. 


नाशिक शहरातील धृवनगर परिसरात सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास ध्रुवांशी भूषण रोकडे या चार महिन्याच्या मुलीची गळा चिरून हत्या करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार सासू आणि दिर घराबाहेर गेले असतांना एक महिला घरात आली, तिने सासुबाई कुठे आहे असे मला विचारले असता मी बाहेर गेल्याचं सांगितले. मी थोडी बाहेर जाताच सबंधित महिलेने मागून येऊन रुमालाने नाक दाबत मला बेशुद्ध केले. दिर आणि सासू येताच त्यांनी मला उठवले आणि आम्ही घरात जाताच मुलीची गळ्यावर वार करून हत्या झाल्याचं समोर आलं. दरम्यान याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. 


तर रविवारी रात्री कोयता गॅंग भरवस्तीत फिरून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. अंबड परिसरातील दत्त चौक भागात अज्ञात पाच ते सहाजणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन परिसरात जोरजोराने शिवीगाळ करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. टवाळखोरांनी परिसरातून पायी चालत जोरजोरात शिवीगाळ केली आहे, यातील एक ते दोन टवाळखोरांच्या हातात धारदार कोयते होते. टवाळखोर हे फोनवर बोलताना जोरजोरात शिवीगाळ करीत भर रस्त्यात कोयते आपटत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण


अशा घटना घडत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, दर दिवसाआड असे कोयताधारी टवाळखोर शहरातून मोकाट फिरत असल्याने भिती व्यक्त होत आहे. एकंदरीतच नाशिक शहरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. या सर्व घटनांनी शहरात कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर आळा बसवण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचंच सध्या बघायला मिळत आहे.