Nashik onion Issue : कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा (Onion farmers) रोष वाढला आहे. अधिवेशनात (Budget Session) कांदा प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याचे सांगितलं. बाजार समितीमध्ये लवकरच कांदा खरेदी केंद्रे (Onion buying centers) सुरू करण्यात येतील असे गुरुवारी सरकारकडून आश्वासन दिले मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र दिसून आले. 


गेल्या काही दिवसांपासून राज्यात (Maharashtra) कांद्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने तो संतप्त झाला असून कुठे बाजार समितीत तर कुठे रस्त्यावर कांदा फेकून देत तो आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवतोय. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातही विरोधकांनी कांदा प्रश्न वरून आक्रमक पवित्रा घेतल्याने सरकारची चांगलीच गोची झाली आहे. एकंदरीत ही सर्व परिस्थिती बघता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 


एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे.. शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करू नका. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 'नाफेड'च्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आला असून आतापर्यंत 18 हजार क्विंटल कांदा खरेदी करण्यात आला आहे. अनुदान विचाराधीन आतापर्यंत 18 हजार 743 क्विटल कांदा खरेदी केला आहे. नाफेडला आता बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष कांदा खरेदी करण्यात सांगण्यात येईल. शेतकऱ्यांना अनुदान देणे विचाराधीन आहे. समितीच्या अहवालानंतर अनुदान घोषित करण्यात येईल, असे ते म्हणाले. 


दरम्यान नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात आली असून बाजार समितीत खरेदी केंद्रही उभारण्यात येतील असं सरकारकडून जरी सांगण्यात येत असले तरी मात्र दुसरीकडे अद्याप पावेतो राज्यात कुठेही नाफेडकडून प्रत्यक्षात बाजार समितीत कांदा खरेदी सुरू करण्यात आली नसल्याची माहिती मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी एबीपी माझाशी बोलतांना दिली आहे. तसेच कुठलीही समिती नेमण्याची ही वेळ नसून सरकारकडे सर्व माहिती आहे. त्यामुळे सरकारने वेळकाढू पणा करू नये असही त्यांनी म्हंटल आहे. 


शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच


एकीकडे कांद्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जरी समोरा समोर आले असले आणि सरकारकडून अनेक आश्वासनं जरी देण्यात येत असले तरी मात्र दुसरीकडे कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगावमध्ये (Lasalgaon) परिस्थिती अवघड आहे.  कांद्याला आज तरी भाव मिळेल, या आशेने भर दुपारी रणरणत्या उन्हात शेतकरी ग्रामीण भागातून ट्रॅकटर चालवत बाजार समितीत येऊन पोहोचले. कांद्याच्या लिलावालाही साडेतीन वाजता सुरुवात झाली, मात्र आजही त्यांच्या पदरी निराशाच आली. एकंदरीतच काय तर सरकारकडून जरी नाफेडकडून कांदा खरेदी सुरू करण्यात आल्याचा दावा करण्यात येत असला तरी मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. शेतकरी सध्या मदतीसाठी सरकारकडे आशेने बघत असून सरकार असो किंवा विरोधी पक्षाने या मुद्द्यावरुन फक्त राजकारण न करता खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आली आहे.